How Good Company Improves Your Destiny : आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवन अधिक यशस्वी, आनंदी व अर्थपूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण तत्त्वे सांगितली आहेत. या तत्त्वांचा आपल्या दैनंदिन आयुष्यात अवलंब केल्यास अनेक अडचणींवर सहज मात करता येते. विशेषतः, माणसाच्या यश-अपयशामागे त्याचा सहवास खूप मोठी भूमिका बजावतो. असे आचार्य चाणक्य स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे चांगल्या लोकांची साथ का आवश्यक आहे आणि वाईट संगतीचे दुष्परिणाम काय असू शकतात हे आपण चाणक्य नीतीमधील काही महत्त्वाच्या श्लोकांच्या माध्यमातून जाणून घेऊयात…
दर्शनध्यानसंस्पर्शेर्मत्सी कूर्मी च पक्षिणी।
शिशुं पालयते नित्यं तथा सज्जनसंगतिः ।।
चाणक्य नीतीमधील हा श्लोक सांगतो की, जसे मासे, कासव, पक्षी आपल्या पिलांचे पालन-पोषण अनुक्रमे दृष्टी, ध्यान व स्पर्श यांच्या माध्यमातून करतात. तसेच सज्जन व्यक्तींच्या सहवासात राहणारी व्यक्तीही त्यांच्या विचार, आचार व वर्तनाचा प्रभाव स्वीकारून स्वतःचा विकास घडवते. चांगल्या सहवासामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात आणि ती अधिक सुसंस्कृत व गुणी बनते.
कह कालहा का च में शक्ति को देश कौ व्ययागमौ।
कश्चाहम् का च मे शक्तिः इति चिन्त्यं मुहुर्मुहुः।
चाणक्यांच्या मते, मनुष्याने नेहमी सध्याची परिस्थिती, आपले मित्र कोण आहेत, आपण राहत असलेल्या देशाची स्थिती, आपले उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य समतोल आहे की नाही, आपली सध्याची स्थिती काय आहे आणि आपण किती सक्षम व सामर्थ्यवान आहोत, याचा नेहमी विचार केला पाहिजे. या सर्व बाबींचे योग्य आकलन करूनच प्रत्येक निर्णय आणि कृती केली, तर यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते.
“विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम्।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि।।”
या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, विषातही अमृत मिळाले किंवा घाणेरड्या ठिकाणी सोने सापडले, तर ते स्वीकारण्यास मागे-पुढे पाहू नये. त्याचप्रमाणे ज्ञान जिथे आणि ज्याच्याकडून मिळेल तिथे ते नम्रतेने आत्मसात करावे. कारण- ज्ञानाचा स्रोत महत्त्वाचा नसतो; त्याची गुणवत्ता, उपयुक्तता आणि जीवनाला योग्य दिशा देण्याची क्षमता अधिक महत्त्वाची असते.
