How to control anger : राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात अनेक गोष्टी विस्कळीत करू शकतो. रागात बोललेले शब्द, व्यक्त केलेली भावना अनेकदा मनावर अशा काही जखमा करून जाते की, वेळ निघून गेल्यावरही त्या गोष्टी भरून काढणे कठीण होते किंवा कित्येकदा त्या भरल्याच जात नाहीत. म्हणूनच असे म्हटले जाते की, कोणी आपल्यावर टीका केली किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला तरीही धैर्य व मौन हे सर्वांत मोठे उत्तर असते; तर आज आपण कोणत्या परिस्थितीत शांत राहिले पाहिजे याबद्दल चाणक्य नीतीद्वारे जाणून घेणार आहोत.
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील सर्वांत विद्वान पंडितांपैकी एक होते, ज्यांना अर्थशास्त्र व नीतिशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात मानवी नातेसंबंध, राजकारण, व्यावहारिक जीवनाचे अत्यंत वास्तववादी चित्रण केले आहे. त्यांच्या या ग्रंथात, जीवनातील अशा अनेक पैलूंचे स्पष्टीकरण दिले आहे, जे तुम्हाला कठीण परिस्थितीवर मात करण्यास मदत करू शकतात.
परिस्थिती केव्हा बिघडते?
कधी कधी जीवनात अशा परिस्थिती निर्माण होतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. चाणक्य नीती सांगते की, अशा परिस्थितीत व्यक्तीने आपला राग नियंत्रणात ठेवून संयम बाळगला पाहिजे. कारण- अशा परिस्थितीत रागामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच नुकसानीस कारणीभूत ठरतात. म्हणून अशा परिस्थितीत व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
कोणत्या परिस्थितीत रागावू नका?
अनेक पालक आपल्या मुलांना क्षुल्लक गोष्टींवरून रागावतात किंवा त्यांच्यावर चिडतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, मुले आपल्या चुकांमधून शिकतात आणि नवीन अनुभव मिळवतात. जर आपण त्यांच्यावर रागावलो तर ते प्रयत्न करणे सोडून देतील आणि अनेक नवीन अनुभवांना मुकतील. त्यामुळे पालकांनी छोट्या छोट्या चुकांसाठी मुलांवर रागावणे टाळावे.
कोणत्या गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्याव्यात?
चाणक्य नीती सांगते की, आपण घरातील वडीलधाऱ्यांवर कधीही रागावू नये. पिढीतील अंतरामुळे तुम्हाला कदाचित त्यांचे विचार समजणार नाहीत; पण ते जगाकडे नेहमीच आपल्यापेक्षा दूरदृष्टीने पाहत असतात. म्हणून चाणक्य सांगतात की, आपण घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यावर किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर रागावून प्रतिक्रिया देऊ नये. त्याऐवजी आपण त्यांचे म्हणणे संयमाने ऐकावे आणि त्यांनी अनुभवातून सांगितलेल्या सल्ल्याचा आदर करावा.
