Chanakya Niti Says Habits Could Harm Your Feature : एकदा लागलेली सवय मोडणे आणि एखादी नवीन सवय आंगिकारणे अवघडच असते. पण, प्रयत्न केल्यास या दोन्ही गोष्टी शक्य असतात नाही का? चाणक्य नीतीमध्ये सुद्धा अशा सवयींचे वर्णन केले आहे, ज्या एखाद्या व्यक्तीचे नुकसान करू शकतात. म्हणून, या सवयींवर शक्य तितक्या लवकर नियंत्रण किंवा सोडून दिल्या पाहिजेत. तर नीती ग्रंथात लिहिलेल्या काही श्लोकांचा आपण अर्थ समजून त्या जीवनात अंगीकारल्यास काही वाईट सवयींवर नियंत्रण ठेवता येईल आणि यश व आदर प्राप्त होईल. चला तर या सवयींबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

अस्थिर गोष्टींच्या मागे पळू नका

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव हि ।।

चाणक्य नीतीमधील हा श्लोक सांगतो की, जी व्यक्ती निश्चित किंवा स्थिर गोष्टींचा त्याग करून अनिश्चित किंवा अस्थिर गोष्टींचा पाठीमागे पळते. ती व्यक्ती पुढे जाऊन दोन्ही गोष्टी गमावते. यामुळे घडते असे की, निश्चित लाभही हाती लागत नाही आणि अनिश्चित संधीही हातातून निसटून जाते. त्यामुळे ही सवय शक्य तितक्या लवकर बदलणे आवश्यक आहे.

साधेपणाचा घेतात गैरफायदा

नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम्।
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः॥

हा श्लोक असा सल्ला देतो की, माणसाने अगदी साधे किंवा सरळ असू नये. जंगलात सर्वात सरळ झाडे सर्वात आधी तोडली जातात. त्याचप्रमाणे, वाईट माणसे सरळ माणसाचा सर्वात आधी गैरफायदा घेतात. त्यामुळे ही सवय शक्य तितक्या लवकर बदलण्याचा सल्ला आचार्य चाणक्य देतात.

पैशांची बचत करा

आपदार्थे धनं रक्षेच्छ्रीमतां कुत आपदः ।
कदाचिच्चलते लक्ष्मीसंचितोऽपिविनश्यति ।।

या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी नेहमी पैशाची बचत करून ठेवावी. केवळ आपण श्रीमंत आहोत म्हणून संकटे आपल्यापासून दूर राहतील, असा गैरसमज कोणाच्याही मनात असू नये. नशीब फिरल्यास वर्षानुवर्षे जमवलेली संपत्तीसुद्धा क्षणार्धात कमी होऊ शकते. त्यामुळे विनाकारण किंवा अविचाराने खर्च करण्याची सवय असेल, तर ती त्वरित बदलणे आवश्यक आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)