आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीती आजही लोकांना वाचायला भरपूर आवडते. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत ज्या जीवनातील विविध समस्या सोडवू शकतात. आज, आम्ही आचार्य चाणक्य यांनी सुचवलेल्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला वाईट लोकांपासून दूर राहण्यास मदत करू शकतात.
१. दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जनः।
सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे।।
चाणक्य नीतीमधील हा श्लोक सांगतो की, जर एखाद्या व्यक्तीला वाईट व्यक्ती आणि साप यांच्या संगतीची निवड करायची असेल. तर वाईट व्यक्तीपेक्षा सापाची निवड करणे चांगले राहील. साप केवळ आत्मसंरक्षणासाठी चावतो. तर विषारी व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला इजा पोहोचवू शकते.
२. कुराजराज्येन कुतः प्रजासुखं कुमित्रमित्रेण कुतोऽभिनिवृत्तिः।
कुदारदारैश्च कुतो गृहे रतिः कृशिष्यमध्यापयतः कुतो यशः।।
आचार्य चाणक्य या श्लोकातून सांगतात की, दुष्ट राजाच्या राज्यात प्रजा कधीही सुखी राहू शकत नाही. त्याचप्रमाणे वाईट मित्रासोबत आनंद मिळत नाही, चुकीच्या स्वभावाच्या जोडीदारासोबत घरात सुख-शांती राहत नाही आणि अयोग्य शिष्याला शिकवून शिक्षकाला यश किंवा समाधान मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून शक्य तितके दूर राहावे.
३.”नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः॥”
चाणक्य नीतीमधील या श्लोकानुसार, माणसाने जास्त भोळे किंवा भाबडे असू नये. कारण जंगलात सरळ झाडे आधी तोडली जातात, तर वाकडी झाडे टिकून राहतात. त्याचप्रमाणे, धूर्त लोक नेहमी भोळ्या लोकांचा फायदा घेतात. म्हणून, जीवनात थोडी चातुर्य आणि विवेक आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या चुकीच्या वातावरणापासून किंवा लोकांपासून दूर राहायचे असेल, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
