Enemy In Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील सर्वांत बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले तत्त्वज्ञ मानले जातात. राजकारण, अर्थशास्त्र, कूटनीती आणि मानवी स्वभाव यांविषयी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तितक्याच लागू पडतात. विशेष म्हणजे चाणक्य नीतीमध्ये त्यांनी शत्रू, स्पर्धक आणि विरोधकांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
चाणक्यांच्या मते, शत्रूला कधीही दुर्लक्षित करू नये. कारण- अनेकदा आपल्याला सर्व काही व्यवस्थित सुरू आहे, असं वाटत असतानाच काही लोक शांतपणे आपल्याविरुद्ध योजना आखत असतात. व्यक्तीची एक छोटी चूक, थोडासा निष्काळजीपणा किंवा चुकीचा स्वभाव यांचाच फायदा शत्रू घेतो आणि मग परिस्थिती अचानक हाताबाहेर जाऊ शकते.
विशेष म्हणजे, चाणक्यांनी अशा काही परिस्थितींची माहिती दिली आहे, ज्या वेळी आपल्याला शत्रू सर्वाधिक भारी पडू शकतो. त्यामुळे या गोष्टी वेळेत ओळखून सावध राहणं गरजेचं मानलं जातं.
अनुशासनाचा अभाव ठरू शकतो धोकादायक
चाणक्य नीतीनुसार, जी व्यक्ती शिस्त पाळत नाही, वेळेचं महत्त्व समजून घेत नाही आणि सतत काम पुढे ढकलत राहतो, त्याला शत्रू सहज चितपट करू शकतो. कारण- निष्काळजी व्यक्तीच्या आयुष्यात गोंधळ अधिक असतो आणि त्याच गोंधळाचा फायदा विरोधक घेतात.
उदाहरणार्थ- काम वेळेवर पूर्ण न करणे, सतत आळस करणे किंवा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये विलंब करणे यांमुळे व्यक्तीची प्रतिमा कमकुवत होऊ शकते. चाणक्यांच्या मते, आळस हादेखील माणसाचा मोठा शत्रू आहे. त्यामुळे स्वतःला शिस्तीत ठेवणं हे यशासाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं.
ज्ञान वाढवत राहणं का महत्त्वाचं?
चाणक्यांनी ज्ञानाला व्यक्तीची सर्वांत मोठी ताकद मानलं आहे. त्यांच्या मते, जी व्यक्ती सतत नवीन गोष्टी शिकत राहते, स्वतःच्या कौशल्यात वाढ करत राहतो, त्याला पराभूत करणं सोपं नसतं.
कारण- ज्ञानी व्यक्ती संकट ओळखू शकते आणि योग्य वेळी निर्णय घेऊ शकते आणि विरोधकांच्या प्रत्येक हालचालीचा अंदाज बांधू शकते. उलट जे लोक स्वतःला अद्ययावत (कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार) ठेवत नाहीत, नवीन गोष्टी शिकण्याकडे दुर्लक्ष करतात, ते हळूहळू इतरांपेक्षा मागे पडू लागतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरते. करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्य अशा प्रत्येक ठिकाणी ज्ञान आणि कौशल्य हीच खरी शक्ती असल्याचं चाणक्यांनी सांगितलं आहे.
स्वभावातील ‘या’ चुका बनू शकतात कमजोरी
चाणक्य नीतीमध्ये व्यक्तीच्या स्वभावालाही खूप महत्त्व दिलं गेलं आहे. विशेषतः राग, अहंकार आणि उतावळेपणा हे गुण व्यक्तीला अडचणीत आणू शकतात, असं चाणक्यांनी स्पष्ट केलं आहे.
जे लोक पटकन रागावतात किंवा स्वतःचं कौतुक करण्यात मग्न राहतात, त्यांच्याकडून अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. अशा वेळी शत्रू किंवा विरोधक त्यांची कमजोरी ओळखून त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात.
चाणक्यांच्या मते, शांत स्वभाव, संयम व नम्रता हे गुण व्यक्तीला अधिक मजबूत बनवतात. अशा लोकांवर सहजपणे कोणीही त्याचा प्रभाव टाकू शकत नाही.
यशासोबत वाढतात शत्रू?
चाणक्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. व्यक्ती जसजशी यशाच्या दिशेने पुढे जाते, तसतसे तिचे शत्रू किंवा मत्सर करणारे लोक वाढू शकतात. त्यामुळे यश मिळाल्यानंतर अधिक सतर्क राहणं आवश्यक मानलं जातं.
कारण- प्रत्येक जण तुमच्या यशामुळे आनंदी असेलच असं नाही. काही लोक शांतपणे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आत्मविश्वासासोबतच सावधपणाही आवश्यक असल्याचं चाणक्यांनी स्पष्ट केलं आहे.
चाणक्य नीती आजही लोकांना जीवनातील कठीण परिस्थितींमध्ये योग्य दिशा दाखवते. शिस्त, ज्ञान व संयम या तीन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात, त्याच्यावर शत्रू सहजपणे मात करू शकत नाही, असा संदेश या नीतीतून दिला जातो.
