Chanakya Niti How to Earn Respect and Set Strong Boundaries: लहानपणीचा ‘टपली मारून पळ’ हा खेळ आठवतोय? एखाद्याचे डोळे बांधलेले असायचे आणि आजूबाजूचे मित्र त्याला चिडवत, टपली मारत निघून जायचे. मोठं झाल्यावर खेळ बदलतो; पण काही वेळा मात्र परिस्थिती तशीच राहते. फरक एवढाच की आता टपलीच्या जागी टोमणे, अपमान, शेरेबाजी किंवा तुमच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो. तुम्ही प्रत्येक वेळी शांत राहता आणि समोरच्याला वाटतं, ‘याला काहीही म्हटलं तरी हा काही बोलणार नाही!’
पण, नेमकं इथेच सगळं बदलण्याची गरज असते. चाणक्य नीतीतून घेतला जाणारा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे चांगुलपणा आणि स्वतःचा स्वाभिमान यांमध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट सहन करणं म्हणजे मोठेपणा नाही. उलट, योग्य वेळी स्वतःच्या सहनशीलतेची सीमारेषा स्पष्ट करणं हीदेखील व्यक्तिमत्त्वाची ताकद असू शकते.
तुमचा शांत स्वभावच तुमच्याविरुद्ध वापरला जातोय का?
तुम्ही भांडण टाळता, नातं टिकविण्यासाठी अनेकदा दुर्लक्ष करता आणि समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून मनातलं बोलत नाही. सुरुवातीला हे सगळं योग्य वाटतं. मात्र, हीच पद्धत वारंवार सुरू राहिली, तर काही लोक तुमच्या शांततेला संमती समजू शकतात.
‘काही बोललो तर नातं खराब होईल’, ‘लोक काय म्हणतील?’ किंवा ‘जाऊ दे, कशाला विषय वाढवायचा?’ या विचारांमुळे प्रत्येक वेळी गप्प बसणं टाळायला हवं. एखादी गोष्ट पहिल्यांदा खटकली, तर त्याच वेळी सभ्यपणे ती स्पष्ट करणं अनेकदा पुढचा त्रास टाळू शकतं.
राग नाही, पण शब्दांमध्ये ठामपणा हवा
अपमान झाल्यावर दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसतात. एक म्हणजे सगळं मनात ठेवून गप्प बसणं आणि दुसरी म्हणजे अचानक संतापून स्वतःवरील नियंत्रण गमावणं अशा दोन्ही टाळता येऊ शकतात.
समोरच्याला मोठ्या आवाजात उत्तर देण्याची गरज नाही. शांत आवाजात स्पष्ट शब्द वापरणं पुरेसं असू शकतं. ‘अशा पद्धतीनं माझ्याशी बोलणं मला मान्य नाही’, ‘मतभेद असतील तर आपण बोलू; पण अपमान सहन करणार नाही’ अशी आपली भूमिका वागणुकीतून दाखवून दिल्यास समोरच्याला जरब बसू शकते.
‘नाही’ म्हणण्याची सवय लावा
प्रत्येक वेळी होकार देणारी व्यक्ती चांगली असतेच, असं नाही आणि प्रत्येक गोष्टीला नकार देणारी व्यक्ती वाईट असतेच, असंही नाही. परिस्थितीनुसार वेळोवेळी योग्य तो निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.
तुमच्या वेळेचा, पैशांचा, मदतीचा किंवा भावनांचा गैरफायदा घेतला जात असेल, तर प्रत्येक वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा तुम्ही माझा गैरफायदा घेऊ शकणार नाही हे तुमच्या वर्तनातून दाखवून देता यायला हवे. गरज असेल तेव्हा नम्रपणे ‘नाही’ म्हणणं हा उद्धटपणा नसून, उलट त्यामुळे तुमच्या स्वाभिमानाची ताकद दिसू शकते.
खरा ‘धाक’ नेमका कशातून येतो?
धाक म्हणजे समोरच्याला घाबरवणं नव्हे. धमकी देणं, आरडाओरड करणं किंवा प्रत्येक गोष्टीत आक्रमक होणं याला सामर्थ्य म्हणता येणार नाही. उलट, तुम्ही कोणाशी कसे वागता आणि तुमच्याशी कोण कसे वागू शकते याची सीमारेषा स्पष्ट करण्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी अशी छाप निर्माण होऊ शकते.
तुमच्याशी आदराने वागणाऱ्याला तितकाच आदर देणं हीच भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते, असा चाणक्य नीतीचा आशय मानला जातो.
लोकांना तुमची किंमत कधी कळते?
तुम्ही स्वतःची किंमत आधी स्वतःच्या वागण्यातून दाखवली, तर इतरांकडूनही तसाच आदर मिळण्याची शक्यता वाढते. त्यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडण्याची गरज नाही. फक्त काय व कितपत सहन करायचं आणि कुठे स्पष्टपणे थांबायचं, हे स्वतःसाठी ठरवून घ्या.
कारण- खरा ‘धाक’ वा ‘दरारा’ जो असतो की, ज्यातून दिसून येते की, तुम्ही कोणाला घाबरवत नाही; पण तुमच्या शांततेचा गैरफायदा घेण्याची हिंमतही करणंही कोणाला सहजपणे शक्य होत नाही. तोच फरक ‘गुंडगिरी’ आणि स्वाभिमानातून निर्माण झालेल्या ‘धाक‘ यांमध्ये आहे.
(टीप : या लेखातील विचार चाणक्य नीतीशी संबंधित लोकप्रिय अर्थ आणि जीवनविषयक मांडणीवर आधारित आहेत. त्याकडे आधुनिक मानसशास्त्रीय किंवा वैज्ञानिक नियम म्हणून पाहू नये.)
