Signs of Selfish People: आयुष्यात काही माणसं अशी भेटतात की, आनंदाच्या क्षणी ती आपल्याभोवती असतात; यश मिळालं की कौतुक करतात आणि आपल्याकडे पैसा, प्रतिष्ठा किंवा सुख-सुविधा असतील तर कायम जवळ राहतात. मात्र, परिस्थिती बदलली आणि अडचणींचा काळ सुरू झाला की हीच माणसं अचानक दूर जाऊ लागतात, अशा लोकांना तुम्ही ओळखता का?
आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये माणसाचा स्वभाव, मैत्री, नातेसंबंध आणि व्यवहार याबाबत अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. माणसाची खरी ओळख त्याच्या बोलण्यातून नव्हे तर तो कठीण परिस्थितीत कसा वागतो यावरून होते, असा त्यांच्या विचारांचा गाभा आहे.
चाणक्यांनी दिलं हंसाचं उदाहरण
माणसाचा स्वभाव समजावून सांगताना चाणक्यांनी एका पक्ष्याचं उदाहरण दिलं आहे. हा पक्षी जिथे पाणी असतं तिथे राहतो. मात्र, एखाद्या ठिकाणचं पाणी आटून गेलं की तो ते ठिकाण सोडून दुसरीकडे निघून जातो.
याच उदाहरणातून चाणक्यांनी अशा लोकांच्या स्वभावाकडे लक्ष वेधलं आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात केवळ स्वतःच्या फायद्यासाठी टिकून राहतात.
म्हणजेच जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, यश, सत्ता किंवा इतर सुख-सुविधा आहेत, तोपर्यंत काही लोक तुमच्याशी जवळीक ठेवतील. मात्र, परिस्थिती प्रतिकूल झाली की त्यांचं वागणं बदलू शकतं.
सुखात सोबत, संकटात अंतर!
आयुष्यातील चांगला काळ अनेक माणसांना आपल्याजवळ आणतो. एखाद्याला मोठं यश मिळालं, आर्थिक परिस्थिती सुधारली किंवा समाजात प्रतिष्ठा मिळाली की त्याच्याभोवती अनेक लोक जमा होतात.
पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते, जेव्हा परिस्थिती अचानक बदलते.
आर्थिक अडचण आली, एखाद्या कामात अपयश आलं किंवा कठीण प्रसंग निर्माण झाला की काही जण हळूहळू अंतर ठेवू लागतात. कालपर्यंत सतत फोन करणारी व्यक्ती अचानक संपर्क टाळू लागते. मदतीसाठी पुढे येणारे लोक कारणं सांगू लागतात.
चाणक्यांच्या विचारानुसार, अशा वर्तनातून त्या नात्यामागे असलेला स्वार्थ समोर येऊ शकतो.
श्लोकातून नेमका काय संदेश मिळतो?
चाणक्य नीतीतील संबंधित श्लोकाचा आशय असा आहे की, जिथे पाणी असते तिथे हंस राहतात आणि पाणी आटल्यावर ते ठिकाण सोडतात. माणसाने मात्र अशा स्वार्थी स्वभावाचे अनुकरण करू नये.
यातून केवळ दुसऱ्यांमधील स्वार्थ ओळखण्याचा संदेश मिळत नाही, तर स्वतःच्या वर्तनाचाही विचार करण्याची शिकवण मिळते.
आपण एखाद्या व्यक्तीशी केवळ तिच्या संपत्तीमुळे, पदामुळे किंवा यशामुळे जवळीक तर ठेवत नाही ना? अडचणीच्या काळात त्या व्यक्तीची साथ सोडत नाही ना? हा प्रश्न स्वतःला विचारणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सच्च्या नात्याची ओळख कधी होते?
खरं नातं सुखाच्या काळात नव्हे, तर संकटाच्या वेळी ओळखता येतं. आनंदाच्या प्रसंगी अनेक जण तुमच्यासोबत असतील; मात्र अडचणीच्या काळातही जी व्यक्ती तुमची साथ सोडत नाही, तिच्यावर विश्वास ठेवता येतो.
चाणक्य नीतीचा हा विचार आजच्या काळातही नातेसंबंधांसाठी महत्त्वाचा धडा देतो. केवळ स्वार्थासाठी जोडलेली नाती फार काळ टिकत नाहीत. विश्वास, आपुलकी आणि निःस्वार्थ भावना असतील तरच नातं मजबूत होतं, त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्या चांगल्या काळात सतत जवळ असते आणि अडचणीच्या वेळी मात्र अचानक गायब होते, तर तिच्या वागण्याचा विचार जरूर करा. त्याचबरोबर स्वतःही कोणाच्या सुख-संपत्तीमुळे नव्हे, तर व्यक्ती म्हणून त्याच्याशी नातं जपण्याचा प्रयत्न करा.
टीप : या लेखातील माहिती चाणक्य नीतीतील विचार, धार्मिक श्रद्धा आणि लोकमान्यतांवर आधारित आहे, याला वैज्ञानिक प्रमाण असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.
