Chanakya Niti 3 Life-Changing Habits for Success and Growth: जीवनात यश मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही लोक मेहनत करूनही मागेच राहतात; तर काही कमी प्रयत्नांतही मोठं यश मिळवतात. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात अशा काही महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत, ज्या अंगीकारल्यास यश तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतं, असा विश्वास व्यक्त केला जातो. पण प्रश्न असा आहे की, या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्या खरंच आयुष्य बदलू शकतात का?

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी लिहिलेलं ‘चाणक्य नीती’ आणि ‘अर्थशास्त्र’ हे ग्रंथ आजही जीवन, राजकारण आणि यशस्वी आयुष्याबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्या विचारांमध्ये व्यवहारज्ञान आणि कठोर वास्तवाचा संगम दिसतो. त्यामुळे त्यांच्या नीती आजही लोकांमध्ये तितक्याच प्रभावी मानल्या जातात.

चाणक्य नीतीनुसार, माणसाच्या विचारसरणीपासून ते त्याच्या कृतीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या यश-अपयशात मोठी भूमिका बजावते. विशेष म्हणजे काही छोट्या चुकादेखील मोठ्या संधी हातातून निसटण्याचं कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच या तीन गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

१) संकोच करणं थांबवा- नवीन शिकण्याचा दरवाजा उघडा

चाणक्य नीतीनुसार, जी व्यक्ती संकोच करते, ती अनेक संधी गमावते. प्रश्न विचारण्यास घाबरणं, आपली मतं मांडण्यास मागे हटणं यांमुळे ज्ञान वाढत नाही. अशा लोकांना आयुष्यात पुढे जाणं कठीण होतं. म्हणूनच यशस्वी व्हायचं असेल, तर मनातला संकोच बाजूला ठेवणं गरजेचं मानलं जातं.

२) अपयशाला घाबरू नका- तीच यशाची पायरी

आयुष्यात यश जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच अपयशदेखील शिकवून जाणारं असतं. चाणक्य नीती सांगते की, अपयश आलं तरी घाबरू नका. उलट त्या परिस्थितीतून शिकून पुढे जाण्याची तयारी ठेवा. जी व्यक्ती अपयशानंतरही आत्मविश्वास कमी होऊ देत नाही, त्याचं यश निश्चित असल्याचं मानलं जातं.

३) संधी कधीही सोडू नका- क्षणभराचं दुर्लक्ष महाग पडू शकतं

चाणक्य नीतीनुसार संधी हा आयुष्यातील सर्वांत मोठा गुरू आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, तर यश मिळण्याची शक्यता वाढते; पण संधी हुकली, तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. त्यामुळे सतर्क राहणं आणि वेळेचा योग्य उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

या तीन सवयी जर व्यक्तीनं आपल्या आयुष्यात सातत्यानं पाळल्या, तर त्याच्या विचार आणि कृतीत मोठा बदल होऊ शकतो, असा चाणक्य नीतीचा संकेत आहे. यश एका रात्रीत मिळत नाही; पण योग्य दिशा आणि योग्य सवयींनी ते नक्कीच जवळ येऊ शकतं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)