Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना महान अर्थतज्ज्ञ, राजकारणी आणि नीतिज्ञ मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती या ग्रंथात जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. आजही अनेक लोक चाणक्यांच्या विचारांचे पालन करतात. त्यांच्या मते, चाणक्यांच्या नीती आचरणात आणणे सोपे नसले तरी ज्यांनी त्या स्वीकारल्या, त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यांनी आपल्या अनुभवातून माणसाचे गुण-दोष आणि योग्य-अयोग्य वर्तन याबद्दलही मार्गदर्शन केले आहे. एका श्लोकात चाणक्य सांगतात की कोणत्या प्रकारचे राज्य, स्त्री आणि झाड लवकर नष्ट होतात.
श्लोक:
नदीतीरे च ये वृक्षाः परगेहेषु कामिनी।
मन्त्रिहीनाश्च राजानः शीघ्रं नश्यन्त्यसंशयम्॥
श्लोकाचा अर्थ
नदीच्या काठावर उगवलेली झाडे, दुसऱ्याच्या घरात राहणारी स्त्री आणि योग्य मंत्री किंवा सल्लागार नसलेला राजा हे तिघेही फार काळ टिकत नाहीत. ते लवकर संकटात सापडतात किंवा नष्ट होतात.
श्लोकाचा सार
चाणक्य सांगतात की नदी किंवा तलावाच्या काठावर असलेली झाडे नेहमी धोक्यात असतात. पूर, वादळ किंवा पाण्याचा जोर वाढला की अशी झाडे कधीही कोसळू शकतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य अनिश्चित असते.
त्यानंतर ते म्हणतात की दुसऱ्याच्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडे समाज अनेकदा संशयाने पाहतो. तिच्याबद्दल सहज बोलले जाते किंवा टीका केली जाते. मात्र आजचा काळ बदलला आहे. महिलाही शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात पुढे आहेत. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि त्यांना पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळत आहेत. त्यामुळे अशा जुन्या विचारसरणीत हळूहळू बदल होत आहे.
चाणक्य पुढे सांगतात की ज्या राजाकडे योग्य मंत्री किंवा विश्वासू सल्लागार नसतात, त्याचे राज्य फार काळ टिकत नाही. चांगले सल्लागार हे कोणत्याही राज्याच्या किंवा नेतृत्वाच्या यशासाठी आवश्यक असतात. योग्य मार्गदर्शन नसल्यास राज्य कमकुवत होते आणि शेवटी त्याचा ऱ्हास होतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
