Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार मानले जातात. त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात त्यांनी जीवनातील समस्या आणि त्यांच्या उपायांवर सखोल चिंतन केले आहे. यात चाणक्यांनी अशी कारणे सांगितली आहेत की, ज्यामुळे इच्छा असूनही एखादी व्यक्ती श्रीमंत होऊ शकत नाही.

१) अहंकार

चाणक्यांच्या मते, संपत्ती मिळवल्यानंतर एखाद्या व्यक्तीला अहंकार आला तर त्याची संपत्ती फार काळ टिकत नाही. अहंकारामुळे
हळूहळू अधःपतन होते. जे आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगतात, ते अनेकदा आपली बचत गमावतात. अहंकारामुळे व्यक्तीची आकलनशक्ती आणि निर्णयक्षमता कमकुवत होते. संपत्तीच्या हव्यासाने पछाडलेली व्यक्ती हळूहळू आपले नातेसंबंध गमावते.

२) उधळपट्टी

आचार्य चाणक्य देखील उधळपट्टीला आर्थिक दुर्बलतेचे प्रमुख कारण मानतात. चाणक्य नीतीनुसार , अवाजवी आणि अविचारी खर्चामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यांना विनाकारण पैसा उधळण्याची सवय असते, त्यांना वारंवार आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. हे लक्षात ठेवा की, पैसा स्वभावाने खूप चंचल असतो. तो कधीही स्थिर राहत नाही. अनावश्यक खर्चाच्या सवयीमुळे माणसाचा खजिना रिकामा होऊ शकतो.

३) अनैतिक मार्गाने कमावलेली संपत्ती

चाणक्य नीती सांगते की, अनैतिक मार्गाने कमावलेली संपत्ती आयुष्यभर टिकत नाही. एक ना एक दिवस ती हातातून निसटून जातेच. उदाहरणार्थ, लाचखोरी किंवा अनैतिक मार्गाने कमावलेली संपत्ती कायमस्वरूपी नसते. त्यामुळे तुम्हाला तात्पुरते समाधान मिळू शकते, पण ती आयुष्यभर टिकणार नाही. दुसरे म्हणजे, अशा मार्गांनी मिळवलेल्या संपत्तीबरोबर प्रचंड दुःख, कष्ट आणि गरिबीसुद्धा येते. अशी संपत्ती मिळवली तरी, तुम्ही क्षणभरसुद्धा शांततेत जगू शकणार नाही.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)