Chanakya Says 3 Sides of You Can Become Your Enemies: आयुष्यात एखादी समस्या निर्माण झाली की आपण अनेकदा त्यासाठी इतरांना जबाबदार धरतो. शेजारी, कार्यालयातील सहकारी, नातेवाईक किंवा समाजातील लोकांमुळे आपल्याला त्रास होत असल्याचे वाटते. मात्र, प्रत्येक वेळी समस्येचे कारण बाहेरच असेल असे नाही. अनेकदा आपल्या आयुष्यातील अडचणींचे मूळ आपल्या अगदी जवळ, कधी कधी आपल्या घरात आणि आपल्या स्वतःच्या विचारांमध्येच दडलेले असते.

महान रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी मानवी स्वभावाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यांच्या नीतीमध्ये माणसाच्या यशासाठी तसेच अपयशापासून दूर राहण्यासाठी अनेक महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. चाणक्यांच्या मते, काही गोष्टी इतक्या जवळ असतात की आपण त्यांना शत्रू समजतच नाही. मात्र, याच गोष्टी हळूहळू सुख, यश आणि मनःशांती हिरावून घेऊ शकतात.

नेमके हे शत्रू कोणते? आणि त्यांना ओळखायचे कसे? जाणून घेऊया…

१. अति प्रेम आणि मोह ठरू शकतो घातक

आपल्या माणसांवर प्रेम असणे स्वाभाविक आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीबद्दलचे प्रेम इतके वाढले की त्याच्या चुका, चुकीचे निर्णय किंवा गैरवर्तनही आपल्याला दिसेनासे झाले तर हेच प्रेम पुढे अडचणीचे कारण ठरू शकते.

चाणक्य नीतीमध्ये ‘अति स्नेह पापाय भवति’ असा विचार सांगितला आहे. याचा साधा अर्थ असा की, अति प्रेम किंवा अति मोह अनेकदा दुःखाचे कारण ठरू शकतो.

घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला इतका मोह असतो की तिच्या प्रत्येक चुकीचे समर्थन आपण करू लागतो. मुलं, भाऊ-बहीण, जोडीदार किंवा आई-वडील यांच्याबाबतही असे होऊ शकते. एखादी व्यक्ती वारंवार चूक करत असतानाही आपण तिला वाचवत असू, तिच्यामुळे स्वतःचे नुकसान करून घेत असू, तर हा अंध मोह आपल्यासाठी अडथळा ठरू शकतो.

२. ‘मीच बरोबर’ हा अहंकार

घरातील शांतता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे अहंकार. प्रत्येक गोष्टीत आपणच योग्य आहोत, आपलेच मत अंतिम आहे आणि इतरांनी आपले म्हणणे ऐकलेच पाहिजे, अशी भावना नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकते.

चाणक्यांनी अहंकाराला माणसाच्या अधःपतनाचे महत्त्वाचे कारण मानले आहे. ‘मी’ आणि ‘माझे’ यामध्ये माणूस अडकला की त्याला समोरच्या व्यक्तीचे मत, भावना किंवा अडचणी समजून घेणे कठीण जाते.

तुम्ही चूक झाली तरी माफी मागण्यास टाळाटाळ करता का? इतरांचे मत नेहमी कमी लेखता का? घरातील प्रत्येकाने तुमच्या मनःस्थितीनुसार वागावे असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील, तर स्वतःमध्ये डोकावण्याची गरज आहे.

३. आळस हा सर्वांत मोठा शत्रू

चाणक्यांच्या मते माणसाच्या प्रगतीसमोर उभा राहणारा सर्वांत मोठा अडथळा म्हणजे आळस. यासाठी चाणक्य नीतीमध्ये ‘आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः’ असे म्हटले आहे. म्हणजेच, माणसाच्या शरीरात राहणारा आळस हा त्याचा मोठा शत्रू आहे.

आळस नेहमी मोठ्या रूपात समोर येत नाही. अनेकदा तो काम उद्यावर ढकलणे, जबाबदारी टाळणे, सतत कारणे देणे किंवा स्वतःच्या प्रयत्नांपासून दूर पळणे अशा छोट्या सवयींमधून दिसतो.

घरातील एखादी व्यक्ती सतत जबाबदाऱ्या टाळत असेल, प्रत्येक कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहत असेल किंवा प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलत असेल तर ही सवय केवळ तिच्याच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीलाही अडथळा ठरू शकते.

म्हणूनच चाणक्य नीतीचा संदेश स्पष्ट आहे; शत्रू नेहमी बाहेरच शोधू नका, कधी कधी आपल्या सवयी, विचार आणि स्वभावातील काही गोष्टीच आपल्या प्रगतीच्या मार्गातील सर्वांत मोठे अडथळे ठरतात. त्यांना वेळीच ओळखून सुधारण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.