Chanakya Niti 3 Secrets to Earn Success, Money and Respect: आयुष्यात पैसा, संपत्ती आणि सुखसोई मिळवणे महत्त्वाचे आहेच; मात्र समाजात मिळणारा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा ही प्रत्येकासाठी तितकीच मौल्यवान असते. एखाद्या व्यक्तीची खरी ओळख त्याच्याकडे किती पैसा आहे यावर नव्हे, तर तो इतरांशी कसा वागतो, त्याचे आचरण कसे आहे आणि समाजासाठी त्याची भूमिका काय आहे यावरून ठरते. त्यामुळेच अनेकांना प्रश्न पडतो की, समाजात आपली प्रतिष्ठा कशी निर्माण करावी? याचे उत्तर आचार्य चाणक्यांच्या नीतीमध्ये पाहायला मिळते.
आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ व राजनीतिज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला साम्राज्य उभारण्यात महत्त्वाची मदत मिळाली. चाणक्यांनी मानवी स्वभाव, व्यवहार, नेतृत्व, संपत्ती आणि सामाजिक जीवन यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांचे हे विचार पुढे चाणक्य नीतीमध्ये संकलित करण्यात आले.
विशेष म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेल्या या नीती आजच्या काळातही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतात. समाजात यश, मान आणि प्रतिष्ठा मिळवायची असेल, तर व्यक्तीच्या स्वभावात काही विशिष्ट गुण असणे आवश्यक आहे, असे चाणक्यांच्या विचारांतून दिसून येते. नेमके कोणते आहेत हे गुण? जाणून घेऊया…
१. स्वार्थ आणि लोभापासून दूर राहा
चाणक्यांच्या मते, केवळ स्वतःचा फायदा पाहणारी व्यक्ती दीर्घकाळ यशस्वी होऊ शकत नाही. स्वार्थासाठी सतत इतरांचा विचार न करणाऱ्या व्यक्तीपासून लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत केवळ लोभ किंवा तात्पुरता फायदा मिळविण्यासाठी आपल्या मूलभूत स्वभावात चुकीचे बदल करू नयेत.
एखाद्या निर्णयाचा परिणाम काय होईल, त्याचा इतरांवर कसा प्रभाव पडेल आणि आपण जे करीत आहोत, ते योग्य आहे का, याचा विचार करून वागणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या आणि संयमाने वागणाऱ्या व्यक्तीला समाजात विश्वास मिळतो. हाच विश्वास पुढे यश आणि प्रतिष्ठेची भक्कम पायाभरणी करतो.
२. नम्रता कधीही सोडू नका
यश मिळाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवणे ही मोठी कला आहे. चाणक्यांच्या मते, व्यक्तीच्या आचरणात नम्रता असणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्ञान, पैसा, सत्ता किंवा पद मिळाल्यानंतर काही जणांच्या वागण्यात अहंकार येतो. मात्र, अहंकारामुळे व्यक्तीभोवतीचे लोक दूर जाऊ शकतात. याउलट नम्र स्वभावाच्या व्यक्तीशी संवाद साधणे प्रत्येकाला सहज वाटते.
चाणक्यांच्या नीतीनुसार, नम्र व्यक्ती आपल्या वागणुकीतून समोरच्याचा आदर करते. त्यामुळे तिचे संबंध अधिक दृढ होतात. इतकेच नव्हे, तर विरोध करणारी व्यक्तीही योग्य वर्तनामुळे जवळ येऊ शकते. म्हणूनच यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही नम्रता कायम ठेवणे आवश्यक आहे.
३. प्रत्येक जीवाचा आदर करा
समाजात मान-सन्मान मिळविण्यासाठी इतरांना योग्य आदर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चाणक्यांच्या मते, समोरची व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब, मोठ्या पदावर आहे की सामान्य आहे, यापेक्षा ती एक माणूस आहे याचा विचार करून तिच्याशी आदराने वागले पाहिजे.
जो माणूस इतरांचा अपमान करतो, त्याला दीर्घकाळ समाजात प्रतिष्ठा मिळणे कठीण असते. कारण- सन्मान हा एकतर्फी मिळत नाही. आपण इतरांना ज्या पद्धतीने वागणूक देतो, त्याच पद्धतीची वागणूक अनेकदा आपल्यालाही मिळते.
त्यामुळे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर केवळ पैसा किंवा प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा चांगले आचरण, नम्रता आणि इतरांप्रति आदर या तीन गोष्टी आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे.
चाणक्यांच्या विचारांचा गाभा हाच आहे की, व्यक्तीचे खरे सामर्थ्य त्याच्या वर्तनातून दिसते. त्यामुळे यश मिळविण्याबरोबरच ते टिकविण्यासाठीही चांगला स्वभाव आणि योग्य आचरण आवश्यक आहे.
(टीप : या लेखातील माहिती चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या विचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. यातील विचार हे मार्गदर्शनाच्या स्वरूपात घ्यावेत. कोणताही निर्णय घेताना परिस्थिती आणि योग्य-अयोग्य बाबीचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे.)
