Chanakya Niti 3 Money Management Tips: आयुष्यात पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य पद्धतीने वापरणे आणि जपून ठेवणेही गरजेचे आहे. अनेक जण दिवसभर मेहनत करून पैसे कमावतात; मात्र महिन्याच्या शेवटी हातात काहीच शिल्लक राहत नाही. कधी अचानक उद्भवणारा खर्च तर कधी विनाकारण होणारी उधळपट्टी, यामुळे आर्थिक अडचणी वाढत जातात. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आजही महत्त्वाच्या मानल्या जातात. चाणक्य नीतीनुसार, पैशांचे योग्य नियोजन, त्याचा सत्कार्यासाठी वापर आणि चुकीच्या कामांपासून दूर राहणे या गोष्टी आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. नेमके कोणते आहेत चाणक्यांनी सांगितलेले हे तीन उपाय? जाणून घेऊया…

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल राजनीतिज्ञ म्हणून ओळखले जातात. मानवी स्वभाव, समाजव्यवस्था, राजकारण आणि अर्थकारण यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या विचारांचा संग्रह असलेल्या चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पैसा कसा कमवावा, त्याचा वापर कसा करावा आणि कठीण काळात आर्थिक अडचणींचा सामना कसा करावा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांच्या मते, उत्पन्नाचे साधन नसल्यास माणसाचे आयुष्य अनेक अडचणींनी वेढले जाऊ शकते, त्यामुळे पैसा कमावण्याबरोबरच त्याचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच आवश्यक आहे.

१. कमाईतील काही रक्कम नेहमी बचत करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, पैसा कमावणे जितके आवश्यक आहे, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे कमावलेल्या पैशांमधून काही रक्कम वाचवून ठेवणे. कारण आयुष्यात परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. कधी अचानक आजारपण येते, तर कधी नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी आधी केलेली बचत उपयोगी पडते.

चाणक्यांच्या मते, जी व्यक्ती भविष्यातील संकटांचा विचार करून आजपासूनच पैशांची बचत करते, ती खऱ्या अर्थाने बुद्धिमान असते. याउलट, जी व्यक्ती विनाकारण खर्च करते आणि पैशांचे योग्य नियोजन करत नाही, तिला कठीण काळात दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू शकते, त्यामुळे उत्पन्न कितीही कमी असले तरी त्यातील काही भाग नियमितपणे बाजूला ठेवण्याची सवय लावावी असा या विचाराचा अर्थ आहे.

२. पैशांचा वापर जनकल्याणासाठी करा

चाणक्य नीतीनुसार, पैशांचा उपयोग केवळ स्वतःच्या सुखसोयींसाठी न करता इतरांच्या मदतीसाठीही करायला हवा. गरजू व्यक्तींना मदत करणे, गरीब आणि आजारी लोकांना आधार देणे, तसेच शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावणे यांसारखी कामे महत्त्वाची मानली जातात.

आचार्य चाणक्य यांनी कुष्ठरोग्यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्याचे महत्त्व सांगितले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला शिक्षण मिळावे यासाठी आपल्या कष्टाच्या कमाईतील काही भाग खर्च करणे हेही पुण्याचे कार्य मानले आहे. त्यांच्या मते, अशा सत्कार्यांमुळे व्यक्तीच्या संपत्तीला योग्य दिशा मिळते.

याशिवाय रुग्णालये, विहिरी, बारव, धर्मशाळा आणि शाळा उभारण्यासाठी आर्थिक मदत करणे हीदेखील समाजोपयोगी कामे आहेत. अशा कामांसाठी संपत्तीचा वापर केल्यास त्या संपत्तीचा सदुपयोग होतो. केवळ पैसा साठवून ठेवण्यापेक्षा त्यातून समाजासाठी काही चांगले घडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश चाणक्यांच्या या विचारातून मिळतो.

३. चुकीच्या कामांसाठी पैशांचा वापर करू नका

चाणक्य नीतीमध्ये पैशांच्या वापराबाबत आणखी एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. तो म्हणजे, पैशांचा वापर कधीही चुकीच्या हेतूने करू नये. संपत्तीचा उपयोग वाईट कामांसाठी, अति मौजमजेसाठी किंवा दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी केला तर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत.

चाणक्यांच्या मते, धन हे चंचल मानले जाते, त्यामुळे ते मिळवताना आणि खर्च करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पैशांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीची संपत्ती कालांतराने नष्ट होऊ शकते, त्यामुळे पैसा मिळवण्याचा मार्ग योग्य असण्याबरोबरच तो खर्च करण्यामागचा हेतूही चांगला असायला हवा.

चाणक्य नीतीतून काय शिकायला मिळते?

पैशांची बचत करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे आणि संपत्तीचा गैरवापर टाळणे हे चाणक्यांनी सांगितलेल्या विचारांचे महत्त्वाचे पैलू आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने आर्थिक शिस्त निर्माण होण्यास आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यास मदत होऊ शकते. अर्थात, केवळ या उपायांमुळे धनप्राप्तीची हमी मिळत नाही; मात्र योग्य आर्थिक सवयी अंगीकारण्यासाठी चाणक्यांचे हे विचार आजही मार्गदर्शक ठरू शकतात.