Chanakya Niti 3 Secrets to Build and Protect Wealth: पैसा कमावण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करतो. मात्र, भरपूर कमाई असूनही अनेकांच्या हातात पैसा टिकत नाही. अचानक येणारा खर्च, अनावश्यक खरेदी किंवा चुकीचे आर्थिक निर्णय यामुळे महिन्याच्या शेवटी पुन्हा पैशांची चणचण भासू लागते. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो.
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात धन, संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते केवळ भरपूर पैसा कमावणे पुरेसे नसून, तो योग्य मार्गाने कमावणे, जपून ठेवणे आणि योग्य ठिकाणी खर्च करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे आर्थिक अडचणींपासून दूर राहायचे असेल तर चाणक्यांच्या काही नीती आजही मार्गदर्शक ठरू शकतात.
पहिली गोष्ट; कमाईचा मार्ग स्वच्छ असावा
चाणक्यांच्या मते धन कमावण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने कमावले जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. चुकीच्या मार्गाने, फसवणूक करून किंवा अनैतिक पद्धतीने मिळवलेला पैसा काही काळ सुख देऊ शकतो; मात्र अशी संपत्ती कायमस्वरूपी टिकत नाही.
अशा प्रकारे मिळवलेल्या पैशांमुळे पुढे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या, कायदेशीर अडचणी किंवा अचानक होणारे नुकसान यामुळे पैसा हातातून निघून जाऊ शकतो. याउलट मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गाने कमावलेली संपत्ती मनाला समाधान देते आणि दीर्घकाळ उपयोगी पडते. म्हणून कमाई किती आहे, यापेक्षा ती प्रामाणिक मार्गाने मिळते आहे का, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दुसरी गोष्ट; पैशांची उधळपट्टी टाळा
पैसा कमावणे अवघड असते; मात्र कमावलेला पैसा टिकवणे त्याहूनही मोठे कौशल्य आहे. चाणक्यांच्या मते अनावश्यक खर्च करण्याची सवय एखाद्या व्यक्तीला हळूहळू आर्थिक संकटाकडे घेऊन जाऊ शकते.
उत्पन्न वाढले की खर्चही त्याच प्रमाणात वाढवण्याऐवजी भविष्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवणे आवश्यक आहे. गरज नसताना महागड्या वस्तू खरेदी करणे, दिखाव्यासाठी खर्च करणे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे टाळावे.
आज थोडी बचत करण्याची सवय लावली तर भविष्यात अचानक आलेल्या अडचणींचा सामना करणे सोपे जाते, त्यामुळे कमाईचा काही भाग बचतीसाठी राखून ठेवणे हा आर्थिक शिस्तीचा महत्त्वाचा भाग आहे.
तिसरी गोष्ट; ध्येय निश्चित करा
पैसा कमवायचा आहे अशी इच्छा असणे पुरेसे नाही. त्यासाठी नेमके ध्येय आणि योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. चाणक्यांच्या विचारानुसार दिशाहीन मेहनतीपेक्षा नियोजनबद्ध प्रयत्न अधिक प्रभावी ठरतात.
तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे, उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते मार्ग निवडायचे आहेत आणि भविष्यात आर्थिकदृष्ट्या कुठे पोहोचायचे आहे हे आधी निश्चित करा. त्यानंतर त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत राहा.
विशेष म्हणजे, तुमच्या महत्त्वाच्या आर्थिक योजना प्रत्येक व्यक्तीला सांगत बसू नका. योजना पूर्ण होण्यापूर्वी त्याची चर्चा सर्वत्र केल्यास अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे योग्य वेळ येईपर्यंत आपल्या योजनांबाबत गुप्तता राखणेही महत्त्वाचे आहे.
कंगालीपासून दूर राहण्यासाठी शिस्त महत्त्वाची
चाणक्यांच्या या विचारांचा मुख्य उद्देश केवळ श्रीमंत होणे हा नाही. पैसा कमावतानाच त्याचे योग्य नियोजन करणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि भविष्यासाठी तयारी ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रामाणिक कमाई, नियंत्रित खर्च आणि स्पष्ट आर्थिक ध्येय या तीन गोष्टी एखाद्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी मदत करू शकतात, त्यामुळे सतत पैशांची चिंता करण्याऐवजी आपल्या कमाईच्या पद्धतीपासून खर्चाच्या सवयींपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे शिस्तीने पाहणे गरजेचे आहे.
(अस्वीकरण : या लेखात दिलेली माहिती चाणक्य नीतीतील विचार आणि सामान्य मान्यतांवर आधारित आहे. याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक सल्ला समजू नये. आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)
