Chanakya Niti for Lucky People These 3 Things Bring Success and Happiness: आचार्य चाणक्य यांना भारतीय इतिहासातील सर्वांत विद्वान आणि दूरदृष्टी असलेल्या विचारवंतांपैकी एक मानले जाते. त्यांच्या विचारांमध्ये केवळ राजकारण किंवा प्रशासनच नव्हे, तर सामान्य माणसाच्या आयुष्यातील यश, सुख आणि समृद्धीचेही अनेक धडे दडलेले आहेत. आजही चाणक्य नीतीतील अनेक गोष्टी लोकांना मार्गदर्शन करताना दिसतात.

चाणक्य नीतीमध्ये काही अशा गोष्टींचा उल्लेख आढळतो, ज्या प्रत्येकाला मिळतातच असे नाही. उलट, या गोष्टी ज्यांच्या आयुष्यात असतात, त्यांना खऱ्या अर्थाने भाग्यवान मानले जाते. विशेष म्हणजे या गोष्टी केवळ संपत्तीशी संबंधित नसून, आयुष्य अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या आहेत.

मग नेमक्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, ज्या मिळणं हे चाणक्यांच्या मते, मोठं भाग्य मानलं जातं? जाणून घेऊया.

चांगला जीवनसाथी मिळणं हे मोठं भाग्य

चाणक्यांच्या विचारांनुसार, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात योग्य आणि साथ देणारा जीवनसाथी मिळेलच, असे नाही. पण ज्याला समजूतदार, विश्वासू आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे साथ देणारा जोडीदार मिळतो, तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो.

जीवनात सुखाचे क्षण असोत किंवा कठीण प्रसंग, चांगला जीवनसाथी नेहमी सोबत उभा राहतो. अशा व्यक्तीमुळे आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करणे सोपे होते. म्हणूनच चाणक्यांच्या मते, चांगला जोडीदार मिळणे ही संपत्तीपेक्षाही मोठी देणगी आहे.

दानधर्म करण्याची क्षमता असणं

चाणक्य नीतीनुसार, इतरांना मदत करण्याची आणि दानधर्म करण्याची क्षमता असणारी व्यक्तीही भाग्यवान मानली जाते. कारण- दान करण्यासाठी केवळ पैसा असणे पुरेसे नसते, तर त्यामागे मोठेपणा आणि उदार मनही असावे लागते.

ज्याच्याकडे इतरांच्या मदतीसाठी काहीतरी देण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे जीवनात पुरेशी साधनसंपत्ती आणि समाधान असल्याचे मानले जाते. चाणक्यांच्या मते, अशी ताकद प्रत्येकाला मिळत नाही. त्यामुळे दान करण्याची क्षमता हीही एक मोठी संपत्ती मानली जाते.

उत्तम आरोग्य हीच खरी श्रीमंती

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक पैसा कमावण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. मात्र चाणक्यांच्या मते, चांगल्या आरोग्याइतकी मौल्यवान गोष्ट दुसरी कोणतीही नाही.

एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असू शकतो; पण जर त्याची तब्येत चांगली नसेल, तर त्या संपत्तीचा आनंद घेणं कठीण होतं. उलट, उत्तम शरीर आणि उत्तम आरोग्य असेल, तर जीवनातील अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो.

चाणक्यांच्या विचारांनुसार, जे लोक आरोग्यदृष्ट्या सक्षम आहेत, जे मनापासून जेवू शकतात आणि दैनंदिन आयुष्य आनंदाने जगू शकतात, ते खऱ्या अर्थाने भाग्यवान असतात.

चाणक्यांचा संदेश काय सांगतो?

चाणक्य नीतीनुसार खरे भाग्य हे केवळ पैशात नसते. आयुष्यात साथ देणारा जोडीदार, इतरांना मदत करण्याची क्षमता आणि उत्तम आरोग्य या गोष्टी मिळाल्या, तर माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध मानला जाऊ शकतो.

(टीप : ही माहिती चाणक्य नीतीमध्ये वर्णन केलेले पारंपरिक विचार आणि मान्यतांवर आधारित आहे.)