Chanakya Niti 3 Rules to Earn Respect in Society: समाजात प्रत्येक व्यक्तीला मान-सन्मान मिळावा, आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि इतरांनी आपल्याबद्दल आदराने बोलावे असे वाटत असते. मात्र केवळ पैसा, पद किंवा प्रतिष्ठा मिळवून समाजात आदराचे स्थान निर्माण करता येत नाही. त्यासाठी आपल्या वागणुकीत, बोलण्यात आणि विचारांमध्येही काही चांगले गुण असणे आवश्यक असते. अनेकदा नकळत आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे इतरांच्या मनातील आपल्याविषयीचा आदर कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे, या चुका वेळीच सुधारल्या तर नातेसंबंधांपासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिमा सुधारण्यास मदत होऊ शकते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मानवी स्वभाव, नातेसंबंध, व्यवहार आणि जीवनातील यश यांसंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, माणसाने समाजात वावरताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. या गोष्टी केवळ वैयक्तिक आयुष्यासाठीच नव्हे, तर कुटुंब, मित्रपरिवार आणि कार्यक्षेत्रातही महत्त्वाच्या ठरतात. मग समाजात स्वतःचा मान-सन्मान वाढवायचा असेल तर चाणक्य नीतीतील कोणत्या तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? जाणून घेऊया.

१. ज्ञान मिळवण्याची जिद्द कधीही सोडू नका

समाजात मानाचे स्थान मिळवायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या ज्ञानात सातत्याने भर घालणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीकडे किती पैसा आहे किंवा तिच्याकडे किती मोठे पद आहे, यापेक्षा त्या व्यक्तीचे विचार, अनुभव आणि ज्ञान अधिक प्रभावी ठरू शकते. ज्ञानी आणि सुशिक्षित व्यक्तीला समाजात नेहमीच आदराने पाहिले जाते.

चाणक्य नीतीनुसार ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणालाही हिरावून घेता येत नाही, त्यामुळे माणसाने कधीही शिकणे थांबवू नये. नवीन गोष्टी वाचणे, वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घेणे आणि आपल्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेतले म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही नवीन शिकण्याची संधी मिळत असते.

विशेष म्हणजे, सतत ज्ञान मिळवत राहिल्याने व्यक्तीच्या विचारांमध्ये प्रगल्भता येते. कोणत्याही विषयावर बोलताना आत्मविश्वास वाढतो. तसेच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्यास मदत होते, त्यामुळे इतरांशी संवाद साधताना आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप पडते, म्हणूनच समाजात आदर मिळवायचा असेल तर स्वतःला सतत अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करा.

२. स्वतःची स्तुती करण्याची सवय टाळा

काही लोकांना स्वतःच्या यशाबद्दल, कर्तृत्वाबद्दल आणि मिळवलेल्या यशाच्या टप्प्यांबद्दल इतरांना सतत सांगण्याची सवय असते. आपण किती हुशार आहोत, किती मोठे काम केले आहे किंवा इतरांपेक्षा किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. मात्र, अशा वागण्यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या मनात आदर निर्माण होण्याऐवजी नाराजी निर्माण होऊ शकते.

चाणक्य नीतीनुसार, स्वतःची स्तुती स्वतःच करणे योग्य नाही. माणसाने आपल्या यशाचा अनावश्यक गाजावाजा करण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. तुमच्याकडे किती कौशल्य आहे किंवा तुम्ही किती मोठे यश मिळवले आहे, हे इतरांना तुमच्या वागण्यातून आणि कृतीतून समजू द्या.

खरे तर नम्रपणा हा व्यक्तिमत्त्वातील अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. यश मिळाल्यानंतरही जी व्यक्ती जमिनीवर राहते, इतरांना कमी लेखत नाही आणि स्वतःबद्दल अवाजवी बढाई मारत नाही, अशा व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण होतो, त्यामुळे स्वतःच्या यशाचे प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्या कामाला बोलू द्या. ही सवय अंगीकारल्यास समाजात तुमची प्रतिमा अधिक चांगली होण्यास मदत होईल.

३. लहान-मोठा असा भेद न करता प्रत्येकाचा आदर करा

समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांना आदर देणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा आपण आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींशी नम्रपणे वागतो. मात्र, आपल्यापेक्षा कमी पदावर काम करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीत असलेल्या व्यक्तींशी तितकाच आदराने व्यवहार करत नाही. अशा वागण्यामुळे व्यक्तिमत्त्वातील कमतरता दिसून येते.

चाणक्य नीतीनुसार, तुम्हाला इतरांकडून आदराची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम तुम्ही इतरांचा आदर करायला शिकले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीशी नम्रपणे आणि सन्मानाने वागणे आवश्यक आहे. समोरची व्यक्ती कोणत्या पदावर आहे, तिची आर्थिक परिस्थिती कशी आहे किंवा समाजात तिचे स्थान काय आहे, यावरून तिच्याशी वागण्याची पद्धत ठरवू नये.

कुटुंबातील सदस्य असोत, कार्यालयातील सहकारी असोत किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारे सामान्य नागरिक असोत, प्रत्येकाशी सन्मानाने बोलणे गरजेचे आहे. एखाद्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्याच्या भावनांचा विचार करणे आणि कोणालाही विनाकारण कमी न लेखणे यामुळे नात्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होते. आपल्या वागणुकीतून समोरच्या व्यक्तीला महत्त्व दिले तर तिच्याही मनात आपल्याविषयी आदराची भावना निर्माण होऊ शकते.

समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा!

थोडक्यात सांगायचे तर समाजात आदराचे स्थान मिळवण्यासाठी केवळ मोठे यश मिळवणे पुरेसे नाही, त्यासाठी ज्ञानाची आवड, नम्र स्वभाव आणि इतरांप्रती आदराची भावना असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीतून मिळणारा हा संदेश आजच्या काळातही विचार करण्यासारखा आहे, त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात या तीन गोष्टींचा अवलंब केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवण्यास आणि इतरांशी संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती धार्मिक मान्यता आणि चाणक्य नीतीशी संबंधित प्रचलित विचारांवर आधारित आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही. ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे.)