Chanakya Niti: लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नसून विश्वास, आदर आणि समजुतीवर उभं असलेलं नातं आहे, जे संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतं. त्यामुळे जोडीदार निवडताना घाईघाईने किंवा केवळ भावनेच्या भरात निर्णय घेणं पुढे जाऊन अडचणीचं ठरू शकतं. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये अशा अनेक चांगल्या आणि वाईट गुणांचा उल्लेख केला आहे, ज्यांचा विचार केल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखी होऊ शकतं.
त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची ओळख तिच्या वागण्या-बोलण्यातून, विचारांमधून आणि स्वभावातून होते; फक्त रूप, पैसा किंवा दिखावा यावरून नाही. लग्नापूर्वी या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नात्यात तणाव, विश्वासाचा अभाव आणि सतत वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि संस्कार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
लग्नापूर्वी योग्य जोडीदाराची ओळख का महत्त्वाची आहे?
प्रत्येकाला आपलं वैवाहिक जीवन आनंदी असावं असं वाटतं. पण अनेकदा लोक बाह्य आकर्षण किंवा काही काळाच्या भावनेत वाहून जाऊन असा निर्णय घेतात, ज्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यभर होतो. चाणक्य नीतीनुसार कोणतंही नातं विश्वास, आदर आणि चांगल्या वागणुकीवर टिकून राहतं. या गोष्टींची कमतरता असेल, तर नातं दीर्घकाळ टिकणं कठीण होतं.
१. फक्त सौंदर्य पाहून निर्णय घेऊ नका
सुंदर चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव अधिक महत्त्वाचा असतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, केवळ रूप पाहून लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही. अनेकदा पहिल्या भेटीत झालेलं आकर्षण त्या व्यक्तीचा खरा स्वभाव लपवून ठेवतं. जर त्या व्यक्तीचा स्वभाव कठोर असेल, विचार नकारात्मक असतील किंवा वागणूक चांगली नसेल, तर बाह्य सौंदर्याचं महत्त्व लवकरच कमी होतं. प्रत्यक्ष आयुष्यातही चांगला स्वभाव आणि परस्पर आदर यामुळे अनेक नाती मजबूत झालेली दिसतात, तर केवळ आकर्षणावर उभ्या राहिलेल्या नात्यांमध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात.
२. रागीट स्वभाव आणि कडव्या बोलणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा
छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणं नातं कमकुवत करू शकतं. प्रत्येकालाच कधी ना कधी राग येतो. पण जी व्यक्ती सतत रागावते आणि कडव्या शब्दांत बोलते, तिच्यासोबत आयुष्य जगणं कठीण होऊ शकतं. अशा व्यक्ती छोट्या गोष्टीचाही मोठा वाद करतात. चाणक्य यांच्या मते, गोड बोलणं नातं जोडतं, तर कटू वाणी हळूहळू नातं तुटण्याचं कारण ठरते. त्यामुळे लग्नापूर्वी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेणं आवश्यक आहे.
३. लोभी स्वभावाच्या व्यक्तीपासून दूर राहणं चांगलं
जिथे प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं, तिथे नातं कमकुवत होऊ शकतं. लग्नाचं नातं विश्वास आणि एकमेकांना साथ देण्यावर टिकलेलं असतं. जर एखादी व्यक्ती फक्त पैसा, संपत्ती किंवा आर्थिक स्थिती पाहून नातं जोडत असेल, तर कठीण काळात ती साथ देईलच याची खात्री नसते. आयुष्यात आर्थिक चढ-उतार येत असतात. अशा वेळी परिस्थितीपेक्षा नात्याला महत्त्व देणारा जोडीदारच खरा आधार ठरतो.
४. जो इतरांचा आदर करत नाही, तो तुमचाही आदर करणार नाही
माणसाचं वागणं हीच त्याची खरी ओळख असते. एखादी व्यक्ती आपल्या आई-वडिलांशी, कुटुंबीयांशी, ज्येष्ठांशी आणि समाजातील इतर लोकांशी कसं वागते, यावरून तिचा स्वभाव ओळखता येतो. जर एखादी व्यक्ती सतत इतरांचा अपमान करत असेल किंवा त्यांना आदर देत नसेल, तर लग्नानंतर ती आपल्या जोडीदाराचा आणि त्याच्या कुटुंबाचाही आदर करेल, अशी अपेक्षा ठेवणं कठीण आहे. नात्याचा सर्वात मजबूत पाया म्हणजे परस्पर आदर आणि त्याची कमतरता हळूहळू दुरावा निर्माण करू शकते.
५. चुकीच्या सवयी आणि वाईट वागणूक असलेल्या व्यक्तीपासून दूर राहा
चारित्र्य आणि प्रामाणिकपणा हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. चाणक्य यांच्या मते, धर्म म्हणजे फक्त पूजा-अर्चा नव्हे, तर योग्य-अयोग्य याची जाणीव, प्रामाणिकपणा आणि चांगली कर्मं होय. जी व्यक्ती खोटं बोलते, फसवणूक करते किंवा चुकीची कामं करण्याची सवय लावून घेते, तिच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. अशा व्यक्तीच्या सवयी पुढे जाऊन संपूर्ण कुटुंबासाठी अडचणीचं कारण ठरू शकतात. त्यामुळे लग्नापूर्वी त्या व्यक्तीचं चारित्र्य, वागणूक आणि जीवन जगण्याची पद्धत नीट समजून घेणं आवश्यक आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
