Chanakya Niti For Married Life : वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहण्यासाठी पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा जोडपे आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करतात, जे एका चांगल्या नात्याचे लक्षण मानले जाते. परंतु, आपल्या जीवनशैलीत आणि संस्कृतीत काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या पुरुषांनी आपल्या पत्नीपासून लपवून ठेवण्यातच शहाणपण असते.
असे मानले जाते की, स्त्रियांचा स्वभाव काहीसा हळवा आणि भावूक असतो, ज्यामुळे कठीण प्रसंगात किंवा नकळत काही गुप्त गोष्टी इतरांसमोर उघड होऊ शकतात. जर तुमच्या नात्यात भविष्यात कोणतेही वाद किंवा अडचणी टाळायच्या असतील, तर पुरुषांनी आपल्या पार्टनरसोबत कोणत्या गोष्टी शेअर करणे टाळले पाहिजे? चला तर मग, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
१. आपली कमजोरी कधीही शेअर करू नका
चाणक्य नीतीनुसार, पुरुषाने आपली सर्वात मोठी भीती किंवा कमजोरी कधीही आपल्या पार्टनरबरोबर शेअर करू नये. तुम्ही तुमच्या पत्नीच्या कितीही जवळ असाल, तरीही आपल्या कमजोरी नेहमी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा. आचार्य चाणक्य यांच्या मते, भविष्यात कधी तुमच्या दोघांमध्ये मोठा वाद किंवा भांडण झाले, तर रागाच्या भरात तुमची पत्नी तुमच्याच कमजोरीचा वापर तुमच्याविरुद्ध करू शकते. यामुळे तुमच्या स्वाभिमानाला (सेल्फ-रिस्पेक्ट) ठेच पोहोचू शकते.
२. आपली कमाई आणि सीक्रेट सेविंग्स
चाणक्य नीतीनुसार, पुरुषाने कधीही आपल्या एकूण उत्पन्नाची (टोटल इनकम) आणि बँक बॅलन्सची अचूक माहिती पत्नीला सांगू नये. घर चालवण्यासाठी आवश्यक असणारे बजेट शेअर करणे योग्य आहे, परंतु तुमच्याकडे एकूण किती बॅकअप फंड आणि सेव्हिंग्स आहेत, हे फक्त तुम्हालाच माहीत असायला हवे. आचार्य चाणक्य यांचे असे मानणे होते की, जास्त पैशांची माहिती मिळाल्यास अनेकदा अनावश्यक खर्च (फिजूलखर्ची) वाढतो, ज्यामुळे कठीण काळासाठी ठेवलेली सेव्हिंग्स संपुष्टात येऊ शकते.
३. अपमान किंवा अपयश
आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपल्याला ऑफिस, बिझनेस किंवा मित्रांमध्ये एखाद्या गोष्टीमुळे अपमानित व्हावे लागते किंवा अपयशाचा सामना करावा लागतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुम्ही पुरुष असाल तर अशा गोष्टी पार्टनरबरोबर डिस्कस करणे टाळावे. जर तुम्ही या गोष्टी शेअर केल्या, तर तुम्हाला अडचणीत पाहून ती स्वतः देखील तणावाखाली (स्ट्रेसमध्ये) येईल, किंवा कधी मूड खराब असल्यास नकळत का होईना, ती तुम्हाला या अपयशावरून टोमणे मारू शकते. त्यामुळे या गोष्टी शेअर न करणेच फायद्याचे ठरते.
४. गुप्त दान
आपल्या संस्कृतीमध्ये गुप्त दानाला आणि कोणालाही न सांगता केलेल्या मदतीला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आचार्य चाणक्य यांची नीती आपल्याला शिकवते की, जर तुम्ही एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा गरजूला पैशांची मदत केली असेल, तर याची माहिती तुमच्या पत्नीलाही नसावी. असे म्हटले जाते की, उजव्या हाताने केलेल्या दानाची माहिती डाव्या हातालाही मळू नये. जर तुम्ही याबद्दल तुमच्या पार्टनरला सांगितले, तर कदाचित ती तुमच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू शकते, ज्यामुळे तुमची मानसिक शांतता भंग होऊ शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
