Chanakya Niti : चार चौघात किंवा ऑफिसमध्ये तुम्ही कितीही महत्त्वाचं बोललात, तरी लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात का? तुमच्या बोलण्याला कोणी गांभीर्याने घेत नाही असं तुम्हाला वाटतंय? मग थांबा! कारण तुमच्या बोलण्याची पद्धतच तुमची किंमत ठरवत असते. आचार्य चाणक्यांनी अशा काही ४ सवयी सांगितल्या आहेत, ज्याचा वापर केल्यास गर्दीतही फक्त तुमचंच बोलणं ऐकलं जाईल. समोरची व्यक्ती तुमची प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून ऐकू लागेल. काय आहेत ते नियम? जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…
१) बोलण्यापूर्वी विचार करा आणि परिस्थिती समजून घ्या
आचार्य चाणक्यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीचे बोलणे तेव्हाच प्रभावी मानले जाते जेव्हा तो विचार करून आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन बोलतो. घाईघाईने बोलल्यास लोक त्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात किंवा गैरसमज होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून, कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी आहे आणि तुमच्या बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल हे नक्की समजून घ्या. जेव्हा तुम्ही योग्य विचाराने एखादी गोष्ट बोलता, तेव्हा ती अधिक संतुलित, प्रभावी आणि आदर मिळवून देणारी ठरते.
२) सोपी, स्पष्ट आणि प्रभावी भाषेचा वापर करा
जर तुम्हाला वाटत असेल की, लोकांनी तुमचे बोलणे केवळ ऐकू नये तर ते समजूनही घ्यावे, तर सर्वप्रथम तुम्ही तुमची भाषा जितकी शक्य असेल तितकी सोपी आणि स्पष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही खूप कठीण आणि गुंतागुंतीचे शब्द वापरले, तर समोरची व्यक्ती गोंधळात पडू शकते. असे झाल्यास तुमच्या बोलण्याचा खरा अर्थ कुठेतरी हरवून जातो. आचार्य चाणक्यांच्या मते, थेट आणि स्पष्ट बोलणे नेहमीच जास्त प्रभाव पाडते कारण ते थेट मनाला आणि बुद्धीला भिडते.
३) आत्मविश्वास आणि स्थिरतेने आपले म्हणणे मांडा
आत्मविश्वास कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत करू शकतो. जर तुम्ही तुमचे म्हणणे चाचरत, घाबरत किंवा गोंधळलेल्या मनःस्थितीत मांडले, तर लोक तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाहीत. याउलट, जेव्हा तुम्ही स्पष्ट आवाज, स्थिर विचार आणि आत्मविश्वासाने आपले म्हणणे इतरांसमोर मांडता, तेव्हा लोक नैसर्गिकरित्या तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. असे झाल्यावर लोक तुमचे बोलणे अधिक गांभीर्याने घेऊ लागतात.
४) योग्य वेळ, योग्य जागा आणि योग्य वातावरणाची निवड करा
आचार्य चाणक्यांच्या मते, तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी बोलली पाहिजे असे नाही. त्यांच्या मते, कोणत्याही बोलण्याचा प्रभाव त्याच्या वेळेवर आणि जागेवरही अवलंबून असतो. जर तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्ट बोललात, तर त्याचा प्रभाव खूप वाढतो. परंतु, जर तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या वातावरणात एखादी महत्त्वाची गोष्ट बोललात, तर लोक त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. असे होऊ नये म्हणून आपले म्हणणे मांडण्यापूर्वी परिस्थिती नेहमी समजून घ्या.
५) विनम्रता आणि आदराने बोला
जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट अहंकारात येऊन किंवा उद्धटपणे सांगता, तेव्हा ती कधीही दीर्घकाळ आपला प्रभाव सोडू शकत नाही. आचार्य चाणक्यांच्या मते, जर एखादी व्यक्ती विनम्र असेल, तर लोक त्याचे बोलणे लवकर स्वीकारतात आणि त्याचा आदरही करतात. त्यांच्या मते, शब्दांमध्ये जर शालीनता, आदर आणि मऊपणा असेल, तर समोरची व्यक्ती तुमचे बोलणे ऐकण्यासाठी नेहमीच तयार असते. विनम्रतेमुळे तुमचे बोलणे केवळ प्रभावीच बनत नाही, तर तुमचे व्यक्तिमत्त्वही आकर्षक बनते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
