Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांचं खरं नाव विष्णुगुप्त आणि कौटिल्य होतं. त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीमुळे त्यांना ‘चाणक्य’ हे नाव मिळालं, असं मानलं जातं. लोकांपर्यंत ज्ञान आणि शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक सूत्रं सांगितली. त्यापैकीच एक म्हणजे चाणक्य नीती. या ग्रंथात आयुष्य सुखी, यशस्वी आणि समृद्ध कसं बनवावं, याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच समाजात शांतता, न्याय आणि व्यक्तीच्या प्रगतीसाठीही अनेक उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी असंही सांगितलं आहे की, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी फक्त ताकद असून चालत नाही, तर त्यासाठी बुद्धी आणि योग्य विचारांचीही गरज असते. योग्य नियोजन आणि सतर्कता यांच्या जोरावरच आपण नेहमी शत्रूपेक्षा एक पाऊल पुढे राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या गोष्टींचा अवलंब केल्यास शत्रू किंवा विरोधकांवर मात करता येते.

आपली योजना गुप्त ठेवा

चाणक्य नीतीनुसार, आपल्या योजना किंवा पुढील डावपेच कोणालाही सांगू नयेत. तुमची रणनीती गुप्त राहिली, तर शत्रूला तुमच्या हालचालींचा अंदाज येणार नाही आणि त्याच्यावर विजय मिळवणं सोपं होईल.

शत्रूला कधीही कमी समजू नका

शत्रू कितीही कमकुवत वाटत असला तरी त्याला कधीही कमी लेखू नका. अनेकदा लोक समोरच्याला हलकं समजतात आणि हीच त्यांची मोठी चूक ठरते. त्यामुळे नेहमी सावध राहा.

शत्रूची विचारसरणी आणि डावपेच समजून घ्या

आचार्य चाणक्य यांच्या मते, शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर त्याची विचार करण्याची पद्धत आणि तो कसा काम करतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तुम्ही त्याच्यावर मात करू शकता.

गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका

शत्रूच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. अनेकदा शत्रू मैत्रीचं नाटक करून फसवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)