Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे नाव जवळपास प्रत्येकाने ऐकले आहे. त्यांना भारतातील सर्वात विद्वान आणि महान अर्थतज्ज्ञ मानले जाते. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. आजच्या काळातही चाणक्यांचे विचार लोकांना योग्य मार्ग दाखवत आहेत. मात्र, त्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

चाणक्य नीतीनुसार, काही घरांमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा असते की त्या घरात धनाची देवी लक्ष्मी स्वतःहून येते. चला जाणून घेऊया, अशी भाग्यवान माणसं कोण असतात.

१. गुणी लोकांचा सन्मान

चाणक्य म्हणतात, ज्या घरात गुणी आणि चांगल्या स्वभावाच्या लोकांचा सन्मान केला जातो, त्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास असतो. अशा घरात धन, सुख आणि समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. अशा पवित्र ठिकाणी मूर्ख आणि वाईट विचारांच्या लोकांना स्थान नसते.

२. वाद-विवादापासून दूर राहणारे

चाणक्यांच्या मते, ज्या घरात सतत भांडण, वाद किंवा घरगुती कलह होत नाही, त्या घरात लक्ष्मी स्वतःहून येते. अशा घरातील उत्पन्न आणि संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाते. त्या घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही. पण ज्या घरात नेहमी भांडणं होत असतात, तिथे लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. त्यामुळे त्या घरातील सुख-समृद्धी हळूहळू कमी होऊ लागते.

३. अन्नाचा आदर करणारे

चाणक्य नीतिमध्ये असेही सांगितले आहे की, ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, त्याची किंमत ओळखली जाते आणि अन्न वाया घालवले जात नाही, त्या घरात माता लक्ष्मी नेहमी वास करते. अशा घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही आणि कुटुंबात कायम आनंद व भरभराट राहते. तसेच अशा लोकांचा व्यवसाय आणि कामधंदाही नेहमी चांगला चालतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)