Chanakya Niti: मॅनिप्युलेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडणे. पण हे घडत असताना ते मॅनिप्युलेशन वाटत नाही. ते सल्ल्यासारखं वाटतं. समोरची व्यक्ती आपल्या भल्याचीच काळजी करते, असं वाटतं. पण जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं, तेव्हा तो प्रभाव तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आधीच पडलेला असतो.

शेकडो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी इशारा दिला होता की सर्वात धोकादायक मॅनिप्युलेशन शत्रू करत नाहीत, तर ते लोक करतात जे माणसांच्या कमकुवतपणा आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखतात. चाणक्यांनी राजदरबार, राजा, मंत्री, कुटुंब, मैत्री आणि युती यांचा अभ्यास केला होता. त्यांचा निष्कर्ष असा होता की लोक कमकुवत असल्यामुळे ताकद गमावत नाहीत, तर त्यांना हेच समजत नाही की कधी दुसऱ्याचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या निर्णयांवर हावी होतो.

विचार करण्याची ताकद कमी होऊ लागते

आचार्य चाणक्य यांच्या मते, याची सुरुवात तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती तुमची गरजेपेक्षा जास्त काळजी करू लागते. ती वारंवार तुम्हाला सावध करते, तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करते किंवा तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात काय बरोबर आणि काय चूक हे सांगू लागते. सुरुवातीला हे सगळं आधार देण्यासारखं वाटतं. “ही व्यक्ती माझ्या भल्यासाठीच बोलते,” असं वाटतं. पण हळूहळू तुम्ही प्रत्येक गोष्टीत संकोच करू लागता. स्वतःच्या निर्णयांवर शंका घ्यायला लागता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या व्यक्तीचा सल्ला घेऊ लागता. कारण तुम्हाला मदतीची गरज नसते, तर स्वतःच्या विचारांवरचा विश्वास कमी झालेला असतो.

चाणक्य सांगतात की, हेच सर्वात शांतपणे होणारं मॅनिप्युलेशन आहे. खरी काळजी तुमची विचार करण्याची ताकद वाढवते, पण मॅनिप्युलेट करणारी काळजी ती कमी करते. ज्या क्षणी एखाद्याची काळजी तुम्हाला अधिक सक्षम बनवण्याऐवजी कमी आत्मविश्वासू बनवते, तेव्हा समजा त्याचा प्रभाव सुरू झाला आहे.

तुम्ही कधी वापरले जाल, हेही कळणार नाही

मॅनिप्युलेशनचा दुसरा मोठा मार्ग म्हणजे चापलुसी. प्रत्येकालाच कौतुक आवडतं, त्यामुळे हा मार्ग सर्वात प्रभावी ठरतो. मॅनिप्युलेट करणारी व्यक्ती तुमचं इतकं कौतुक करते की तुमचं महत्त्व त्यांच्या मान्यतेवर अवलंबून राहतं. तुम्ही त्यांच्या मताशी सहमत असाल तर तुम्ही हुशार, आणि नाही असाल तर तुम्ही अडचणीचे. हळूहळू तुम्ही प्रामाणिकपणापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेणं पसंत करू लागता. तुम्ही गप्प राहता, कारण त्यांनी तुमच्याबद्दल तयार केलेली चांगली प्रतिमा बिघडू नये, असं तुम्हाला वाटतं.

चाणक्यांनी याबाबत इशारा दिला होता की अहंकार ही माणसाची सर्वात मोठी कमकुवत बाजू असते. अशा प्रकारे तुमचं स्वातंत्र्य हळूहळू संपत जातं आणि तुम्ही कधी दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागू लागता, हे तुम्हालाच कळत नाही. मग तुम्हाला कोणी आदेश देण्याची गरज राहत नाही, तुम्ही स्वतःच स्वतःला बदलू लागता.

प्रश्न विचारलात तरी तुम्हालाच चुकीचं ठरवलं जातं

मॅनिप्युलेट करणारी व्यक्ती तिला काय हवं आहे हे स्पष्ट सांगत नाही. उलट, तुम्ही प्रश्न विचारलात की तुम्हालाच अपराधी वाटेल असं वातावरण तयार करते. तुमच्या प्रत्येक गोष्टीत ती चुका काढते. वारंवार केलेले उपकार आठवण करून देते आणि स्वतःला महान दाखवते. मग विषय योग्य-अयोग्य याचा राहत नाही, तर “तू इतका कृतघ्न का आहेस?” असा होतो. शेवटी कोणताही ठोस युक्तिवाद न होता तुम्हीच मनाने खचून तिथून निघून जाता.

चाणक्य सांगतात की अपराधीपणाची भावना माणसाची विचार करण्याची ताकद अधिकारापेक्षाही लवकर संपवते. एकदा तुम्ही अपराधी वाटू लागलात की सर्व तर्क निष्फळ ठरतात. मग तुम्ही अनेक गोष्टी सहन करता. तुम्ही सहमत असल्यामुळे नाही, तर विरोध करणं भावनिकदृष्ट्या खूप कठीण वाटत असल्यामुळे.

जिथे मूल्यांचा आधार घेऊन गप्प बसवलं जातं, तिथून दूर व्हा

हे अनेकदा कुटुंबात, समाजात आणि ऑफिसमध्ये पाहायला मिळतं. तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रश्न विचारला की तुम्हाला सांगितलं जातं, “ही परंपरा आहे”, “ही संस्कृती आहे”, किंवा “इथे असंच चालतं.” आणि तिथेच तुमचा मुद्दा संपवला जातो. मग तुम्ही कितीही बरोबर असलात तरी. त्यानंतर तुम्ही मुद्द्यावर चर्चा करत नसता, तर स्वतःच्या स्वभावाचं समर्थन करत बसता.

चाणक्य परंपरेचा आदर करत होते, पण विचार न करता आंधळेपणाने आज्ञा पाळण्याच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं होतं की मूल्यं ही विचार करण्याची दिशा दाखवण्यासाठी असतात, विचारांची जागा घेण्यासाठी नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी मूल्यांचा आधार घेऊन तुम्हाला गप्प बसवते, तेव्हा ती ज्ञानाचं नव्हे तर स्वतःच्या फायद्याचं रक्षण करत असते.

जेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जात नाही

मॅनिप्युलेट करणारी व्यक्ती नेहमी खोटं बोलत नाही. कारण त्याची तिला गरजच नसते. ती तुमच्याबद्दल सगळी माहिती गोळा करते, पण तुम्हाला मात्र पूर्ण माहिती देत नाही. जी माहिती तिच्या फायद्याची असते, तीच योग्य वेळी सांगते. तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात तुमच्यासमोर आधीच मर्यादित पर्याय ठेवलेले असतात. हा मॅनिप्युलेशनचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. कारण चुकीच्या परिणामासाठी तुम्ही स्वतःलाच दोष देता, जरी तो निर्णय पूर्णपणे तुमचा नसतो.

चाणक्य म्हणतात, माहितीवर नियंत्रण म्हणजे पर्यायांवर नियंत्रण.

स्वतःला बळी दाखवून जबाबदारी टाळणे

प्रत्येक वेळी तुम्ही एखादी तक्रार किंवा चिंता व्यक्त केली की समोरची व्यक्ती दुखावल्यासारखी, भावूक किंवा असहाय असल्याचं दाखवते. मग तिच्या वागण्यावरून लक्ष हटून तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर येतं. शेवटी तुम्हीच “मी जरा जास्त कठोर बोललो” म्हणून माफी मागता, जरी तुमचं म्हणणं योग्य असलं तरी. हळूहळू तुम्ही मुद्दे मांडणंच बंद करता. आणि स्वतःलाच विचारू लागता की, “मी खरंच योग्य मुद्दा मांडला होता का?”

चाणक्यांनी इशारा दिला होता की स्वतःला कमकुवत दाखवणंही एक प्रभावी डावपेच असू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती जबाबदारी टाळण्यासाठी स्वतःच्या कमकुवतपणाचा वापर करते, तेव्हा हळूहळू सगळी ताकद तिच्याकडे जाते. तुम्ही तिच्या भावनांची काळजी घेण्यात अडकता आणि ती मात्र जबाबदारीपासून दूर राहते.

दुसऱ्यांचे विचार आपलेच वाटू लागतात

हा मॅनिप्युलेशनचा सर्वात खोल परिणाम असतो. एखादी व्यक्ती सतत तुमच्यासमोर तेच संशय, भीती किंवा विश्वास पुन्हा पुन्हा सांगत राहते. काही काळानंतर ते विचार तुम्हाला ओळखीचे वाटू लागतात. जे ओळखीचं वाटतं ते सुरक्षित वाटतं. आणि जे सुरक्षित वाटतं तेच खरं वाटू लागतं. एक दिवस तुम्ही अशा विचाराचं समर्थन करत असता, जो तुम्ही कधी स्वतः निवडलाच नव्हता. तो विचार दुसऱ्याचा असतो आणि त्यात तुम्ही नकळत अडकलेले असता.

चाणक्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की माणसाचं मन दबावाने नाही, तर सततच्या पुनरावृत्तीने जिंकलं जातं. एकदा एखादा विचार आपलाच वाटू लागला की त्याला विरोध करण्याची शक्यता जवळपास संपून जाते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)