When to Follow Your Mind Instead of Your Heart : आचार्य चाणक्य त्यांच्या काळातील एक अत्यंत बुद्धिमान व ज्ञानी पुरुष होते. त्यांना मानवी विचार, वर्तन आणि जीवनातील आव्हानांची सखोल जाण होती. म्हणूनच त्यांची शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करते. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, माणसाने भावनांच्या आहारी जाऊन योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखायलाच विसरू नये. तुम्ही अनेकदा लोकांना रागाच्या भरात अशा गोष्टी बोलताना पाहिले असेल, ज्यांचा नंतर तुम्हाला पश्चात्ताप होतो. कधीकधी, आपल्या प्रिय व्यक्तीसाठी अति भावनिक झाल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात आणि कधीकधी, कोणाच्यातरी गोड शब्दांवर विश्वास ठेवून आपण स्वतःचेच नुकसान करून घेतो. अशा चुकांमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
चाणक्य नीती आपल्याला कठीण काळात विचारपूर्वक निर्णय घेण्यास शिकवते आणि तसेच धडे देते. चला, अशा पाच प्रसंगांबद्दल जाणून घेऊया, जेव्हा हृदयाने नव्हे, तर मनाने विचार करणे अधिक महत्त्वाचे असते.
राग
कधीकधी, आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे मुद्दाम आपल्याला राग येईल अशा गोष्टी बोलतात, सर्वांसमोर थट्टा करतात किंवा कधीकधी आपल्या टोचून बोलतात. अशा परिस्थितीत, आपल्याला त्यांना लगेचच सडेतोड उत्तर द्यावेसे वाटते. पण, कधीकधी हा राग आपल्याला अशा गोष्टी बोलायला भाग पाडतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चात्ताप होतो. त्यामुळे चाणक्यांच्या शिकवणीतून मिळणारा धडा असा आहे की, रागावर नेहमी नियंत्रण ठेवावे. प्रत्येक गोष्टीवर रागावल्यास इतर लोक त्याचा फायदा घेऊ शकतात आणि तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यापूर्वी किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी शांतपणे विचार करावा.
नातं
नात्यांमध्ये, अगदी लहानसहान गोष्टीसुद्धा अनेकदा मोठ्या भांडणांचे कारण बनू शकतात. कधीकधी मित्राने काहीतरी बोलून आपल्याला दुखावले किंवा कधीकधी कुटुंबातील सदस्य नकळतपणे असे काहीतरी बोलतात ज्यामुळे आपला अपमान होतो. अशा परिस्थितीत, आपण अनेकदा रागाच्या भरात दीर्घकाळचे नातेसुद्धा संपवण्याचा निर्णय घेतो. पण, जेव्हा राग शांत होतो, तेव्हा लक्षात येते की कदाचित ती गोष्ट इतकी मोठी नव्हती. चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही नात्याबद्दल कधीही घाईने निर्णय घेऊ नये. समोरच्या व्यक्तीचे शब्द आणि वागणूक काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. जर काही चूक झाली असेल, तर प्रथम संवादातून ती सोडवण्याचा प्रयत्न करा. केवळ रागामुळे आपल्या प्रिय व्यक्तीबरोबरचे नाते तोडणे योग्य नाही.
कर्ज
पैशांच्या बाबतीत भावनिक होऊन घेतलेला एक छोटासा निर्णयसुद्धा नंतर मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. कधीकधी, एखादा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला त्यांच्या समस्यांबद्दल सांगतो आणि पैसे मागतो. त्यांचे ऐकून तुम्हाला त्यांची दया येते आणि तुम्ही कोणताही विचार न करता त्यांना पैसे देता. पण नंतर, जेव्हा पैसे परत मागण्याची वेळ येते, तेव्हा नात्यात कटुता येऊ लागते. त्याचप्रमाणे, अनेक लोक इतरांच्या प्रभावाखाली येऊन अशा ठिकाणी पैसे गुंतवतात जिथे नुकसानीचा धोका असतो. चाणक्य नीतीमधून मिळणारा धडा म्हणजे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. म्हणून, पैसे देण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी, आपली परिस्थिती आणि त्यातील फायदे-तोटे काळजीपूर्वक समजून घेणे.
अपमान
जेव्हा कोणी सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान करतो तेव्हा राग येणे स्वाभाविक आहे. पण अशा वेळी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी जशास तसे उत्तर देण्याचा मोह होतो. पण, कधीकधी, रागाच्या भरात आपण असे काहीतरी बोलून जातो, ज्यामुळे एका छोट्याशा गोष्टीचे मोठ्या वादात रूपांतर होते. चाणक्य नीतीनुसार, अशा परिस्थितीत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जर कोणी जाणूनबुजून तुमचा अपमान करण्याचा किंवा तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुमचा राग अनावर होऊ देऊ नका. त्याऐवजी, शांतपणे आपले म्हणणे मांडा आणि योग्य वेळी प्रतिसाद द्या. प्रत्येक गोष्टीवर वाद घालण्याची गरज नाही. कधीकधी, शांत राहून परिस्थिती हाताळणेच सर्वात शहाणपणाचे ठरते.
मोठा निर्णय
नोकरी सोडणे, नवीन नोकरी सुरू करणे किंवा दुसऱ्या शहरात जाणे हे सर्व आयुष्यातील मोठे आणि महत्त्वाचे निर्णय आहेत. पण कधीकधी, एखादी समस्या किंवा वाईट अनुभवामुळे भावनांच्या आहारी जाऊन लोक घाईघाईने वागतात. कल्पना करा, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यासोबत तुमचा वाद झाला आणि रागाच्या भरात तुम्ही त्याच दिवशी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर, जेव्हा तुम्हाला दुसरी नोकरी मिळत नाही, तेव्हा तुम्हाला तुमची चूक लक्षात येऊ लागते. चाणक्य नीतीनुसार, आयुष्यातील कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे. एका वाईट अनुभवामुळे असे पाऊल उचलू नका, जे तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकेल. म्हणून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे यांचा काळजीपूर्वक विचार करा.
