Chanakya Niti On Friendship : आजच्या काळात जर आपल्याला एक सुखी, समृद्ध आणि यशस्वी आयुष्य जगायचे असेल, तर मानवी स्वभाव आणि व्यावहारिक जग समजून घेणे खूप गरजेचे आहे. बदलत्या जगासोबत माणसांचे चेहरे आणि त्यांचे स्वभावही बदलू लागले आहेत. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणाला भुलतो आणि आयुष्यात मोठा धोका पत्कारतो. म्हणूनच, समाजात वावरताना फसवणूक टाळण्यासाठी काही व्यावहारिक नियम समजून घेणे आवश्यक आहे. अशीच एक सर्वांत महत्त्वाची आणि आयुष्य बदलून टाकणारी शिकवण म्हणजे, ‘चेहऱ्यावर हसू असणारा प्रत्येक माणूस तुमचा शुभचिंतक किंवा मित्र नसतो.’

आजच्या या मतलबी जगात, जिथे लोक चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात, तिथे ही गोष्ट आपल्याला सावध करण्याचे काम करते. याबाबत आचार्य चाणक्यांनी काही सोपे सल्ले दिले आहेत, ते आपण जाणून घेऊ…

१) चेहऱ्यावरील हसू आणि मनातील हेतू यांतील फरक

आचार्य चाणक्यांच्या मते, केवळ एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा त्याचे गोड हसू पाहून त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नये. हसू ही अशी गोष्ट आहे, जी कोणीही सहज आपल्या चेहऱ्यावर आणू शकते; परंतु त्या हसण्यामागे त्या व्यक्तीच्या मनात आणि डोक्यात काय चालले आहे, हे समजून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. अनेक लोक असे असतात, जे आतून तुमचा द्वेष करीत असतात किंवा तुम्हाला धोका देण्याची संधी शोधत असतात; पण वरून चेहऱ्यावर खोट्या हसण्याचा मुखवटा घालतात. चाणक्यांनी अशा लोकांची तुलना विषाने भरलेल्या अशा घड्याशी केली आहे, ज्याच्या तोंडाला वरून थोडे दूध लावलेले असते.

२) गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा

आजच्या काळात आपल्याला असे अनेक लोक भेटतात, जे आपल्यासमोर खूप गोड आणि चांगले बनतात, तसेच आपल्या प्रत्येक गोष्टीवर खोटी स्तुती (चापलूसी) करतात. आचार्य चाणक्यांच्या मते, अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवून राहिले पाहिजे. जे लोक खरोखरच तुमचे भले इच्छितात, ते तुमच्या चुकांवर तुम्हाला टोकण्यास कधीही घाबरणार नाहीत. मग त्यांचे बोलणे तुम्हाला कितीही कडू का वाटेना. परंतु, जे लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात, ते तुमच्यासमोर नेहमी हसतील आणि तुमच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीलाही होकार देतील. असे लोक काम फत्ते झाल्यावर सर्वाxत आधी तुमची साथ सोडतात.

३) दिखाऊ मित्र, शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक

आचार्य चाणक्यांचे नेहमीच असे मत होते की, जो शत्रू उघडपणे तुमच्यासमोर आहे, तो मित्र बनून सोबत राहणाऱ्या लपलेल्या शत्रूपेक्षा कितीतरी पटींनी चांगला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हसून तुमच्याशी मैत्रीचे नाटक करते, तेव्हा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता आणि तुमच्या आयुष्यातील सर्व गुपिते (सीक्रेट्स) तिच्यासोबत शेअर करता. इथेच तुम्ही सर्वांत मोठी चूक करता. असे लोक तुमच्या कमतरता आणि कमकुवतपणा जाणून घेतात आणि नंतर त्यांचा वापर तुम्हालाच नुकसान पोहोचवण्यासाठी करतात. म्हणूनच कोणाचेही फक्त हसू पाहून विरघळण्याऐवजी त्याचे वर्तन आणि त्याची कामे कशी आहेत यावर लक्ष द्या.

४) स्वतःला फसवणुकीपासून कसे वाचवाल?

चाणक्य नीतीनुसार, जर आपल्याला आजच्या काळात फसवणुकीपासून दूर राहायचे असेल, तर आपले डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवले पाहिजेत. कोणत्याही नवीन व्यक्तीला भेटल्यावर तिच्यावर लगेच डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर एखादी व्यक्ती विनाकारण तुमच्यावर खूप प्रेम दाखवत असेल किंवा गरजेपेक्षा जास्त हसत असेल, तर तुम्ही थोडे सावध झाले पाहिजे. अशा व्यक्तीला समजून घेण्यासाठी थोडा वेळ घ्या. जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो, तेव्हाच लोकांची खरी ओळख पटते. त्यामुळे तुमची गुपिते प्रत्येकाबरोबर शेअर करू नका.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)