Chanakya Niti on Honesty : प्राचीन भारतातील आचार्य चाणक्य हे महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजसल्लागार होते. जीवन कसे जगावे, राज्यकारभार कसा करावा आणि लोकांनी कसे वागावे याबद्दल त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी ‘चाणक्य नीतीमध्ये’ सांगितल्या आहेत. त्यांच्या या विचारांमुळे ते आजही प्रसिद्ध आणि आदरणीय आहेत. तर आज आपण माणसाने प्रमाणापेक्षा जास्त प्रामाणिक का राहू याबद्दल चाणक्य नीती काय सांगते हे जाणून घेणार आहोत.

‘सरळ झाडे सगळ्यात आधी तोडली जातात आणि प्रामाणिक माणसांची सगळ्यात आधी फसवणूक होते’ ; तुम्ही अनेकदा हे वाक्य ऐकून त्याकडे दुर्लक्षही केले असेल. पण, या विधानाद्वारे चाणक्य जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.

चाणक्य प्रामाणिकपणाबद्दल काय म्हणतात?

सरळ आणि चांगली झाडे आधी तोडली जातात, कारण त्यांचा सहज उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि साध्या लोकांचा काही स्वार्थी लोकांकडून सहज गैरफायदा घेतला जाऊ शकतो. चाणक्य यामधून प्रामाणिकपणा चुकीचा आहे असे सांगत नाहीत. मात्र, प्रत्येकजण प्रामाणिक किंवा चांगला असेलच असे नाही, त्यामुळे अशा जगात भोळेपणा, अज्ञान आणि निष्काळजीपणा टाळणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता यांच्यात संतुलन साधले पाहिजे. सत्य बोलणे महत्त्वाचे आहे. पण, नुकसान टाळण्यासाठी परिस्थिती आणि लोकांना समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जास्त प्रामाणिकपणा तुमच्यासाठी धोकादायक का असतो?

चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती स्वतःचे विचार, भावना आणि योजना इतरांना सहज सांगते. ती नकळतपणे इतरांना अशी माहिती देऊ शकते, जिचा वापर नंतर तिच्याच विरोधात केला जाऊ शकतो. अशी व्यक्ती सहजपणे फसवणुकीला बळी पडू शकते. प्रामाणिक असण्याचा अर्थ प्रत्येकाला सर्व काही सांगणे असा होत नाही. तर सत्य बोलत असताना, केव्हा बोलावे, काय सांगावे आणि कोणावर विश्वास ठेवावा हे समजून घेणे असतो.

चाणक्य खोटे बोलण्यास प्रोत्साहन देतात का?

तर असे अजिबात नाही. चाणक्य म्हणतात की, प्रत्येक वैयक्तिक गोष्टी इतरांना न सांगता, प्रत्येकावर लगेच विश्वास न ठेवता, तुमच्या काही योजना आणि वैयक्तिक बाबी स्वतःपुरत्याच ठेवूनही तुम्ही इतरांशी प्रामाणिक राहू शकता.

कपटीपणा आणि विवेकबुद्धी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फसवणूक म्हणजे एखाद्याला जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा चुकीचे मार्गदर्शन देणे. तर विवेकबुद्धी म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगणे आवश्यक नाही, हे समजून वागणे. त्यामुळे चाणक्यांचा संदेश अप्रामाणिक राहण्याचा नसून, परिस्थिती समजून योग्य पद्धतीने आणि विचारपूर्वक प्रामाणिक राहण्याचा आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)