Chanakya Niti 5 Signs of a Wise Person: एखादी व्यक्ती खूप शिकलेली आहे म्हणजे ती बुद्धिमान असेलच असं नाही. अनेकदा कमी बोलणारी, प्रसंगावधान राखणारी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारी व्यक्तीच इतरांपेक्षा अधिक समजूतदार ठरते. आचार्य चाणक्यांच्या नीतीमध्येही माणसाच्या खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख त्याच्या वागण्या-बोलण्यातून कशी होते, याबाबत काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. विशेष म्हणजे, या गुणांसाठी मोठी पदवी किंवा भरपूर पुस्तकी ज्ञान असण्याची गरज नाही. मग समाजाच्या नजरेत बुद्धिमान व्यक्तीची ओळख नेमकी कशी होते? चाणक्यांच्या मते कोणत्या सवयी अशा व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळी ठरवतात? जाणून घेऊया.
बोलण्यापूर्वी विचार करणं
चाणक्यांच्या नीतीनुसार, समजूतदार व्यक्तीची पहिली ओळख तिच्या बोलण्यातून होते. अशी व्यक्ती कोणतीही गोष्ट घाईघाईने किंवा विचार न करता बोलत नाही. समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दांमुळे विनाकारण दुखापत होणार नाही याची ती काळजी घेते.
प्रत्येक प्रसंगी आपलं मत मांडणं आवश्यक नसतं, हेही अशा व्यक्तीला चांगलं ठाऊक असतं, त्यामुळे गरज असेल तेव्हाच ती बोलते. तिचं बोलणं कमी असलं तरी त्यामध्ये विचार आणि अर्थ असतो. चुकीच्या वेळी बोललेले योग्य शब्दही नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतात याची जाणीव तिला असते.
योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता
बुद्धिमत्तेची खरी परीक्षा कठीण प्रसंगी होते. चाणक्यांच्या मते समाज अशा व्यक्तीला बुद्धिमान समजतो, जिला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो.
भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी अशी व्यक्ती परिस्थितीचा शांतपणे विचार करते. एखादा निर्णय घेताना त्याचा स्वतःवरच नव्हे तर इतरांवर होणारा परिणामही ती लक्षात घेते, त्यामुळे संकटाच्या वेळीही योग्य मार्ग निवडण्याची शक्यता वाढते.
वेळ आणि परिस्थितीची जाण
वेळेची किंमत समजणं हा देखील समजूतदार व्यक्तीचा महत्त्वाचा गुण मानला जातो. चाणक्यांच्या विचारांनुसार, कोणत्या वेळी काय करायचं आणि कोणत्या प्रसंगी शांत राहायचं याची जाण असणारी व्यक्ती परिस्थितीवर अधिक चांगल्या प्रकारे मात करू शकते.
आयुष्यात प्रत्येक परिस्थिती सारखी नसते, त्यामुळे परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी असणं महत्त्वाचं ठरतं. अडचणी आल्या तरी त्यानुसार मार्ग बदलत पुढे जाण्याची क्षमता व्यक्तीला अनेक प्रसंगी उपयोगी पडते.
रागाच्या क्षणी संयम राखणं
राग आला की ताबडतोब प्रतिक्रिया देणं सोपं असतं; मात्र त्या क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण असतं. चाणक्यांच्या मते, धैर्य आणि संयम ही व्यक्तीच्या अंतर्गत सामर्थ्याची महत्त्वाची चिन्हं आहेत.
अपमान झाला, नुकसान झालं किंवा एखादी अडचण निर्माण झाली तरी लगेच संतापून निर्णय न घेणारी व्यक्ती अधिक समजूतदार मानली जाते. शांत राहून परिस्थितीचा विचार केल्यामुळे चुकीचे निर्णय टाळता येऊ शकतात, त्यामुळे संयमी स्वभाव व्यक्तीला समाजात वेगळी ओळख मिळवून देऊ शकतो.
कायम काहीतरी शिकण्याची तयारी
बुद्धिमान व्यक्तीला सर्व काही माहीत आहे असा गर्व नसतो. उलट आपल्याला अजूनही बरंच काही शिकायचं आहे याची जाणीव तिला असते. चाणक्यांच्या नीतीनुसार, सतत शिकण्याची इच्छा असणं हा बुद्धिमान व्यक्तीचा महत्त्वाचा गुण आहे.
अशी व्यक्ती केवळ स्वतःच्या अनुभवातूनच नव्हे, तर इतरांच्या अनुभवातूनही शिकण्याचा प्रयत्न करते. नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि चुका सुधारण्याची तयारी असल्यामुळे तिचं ज्ञान आणि निर्णयक्षमता काळानुसार अधिक विकसित होऊ शकते.
म्हणूनच एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता केवळ तिच्या शिक्षणावर किंवा पदावरून ठरवता येत नाही. तिचं बोलणं, निर्णय घेण्याची पद्धत, परिस्थितीची जाण, संयम आणि शिकण्याची वृत्ती या गुणांमधूनही तिचा समजूतदारपणा दिसून येतो. चाणक्यांच्या विचारांवर आधारित या गोष्टी आजच्या दैनंदिन जीवनातही अनेकांना उपयोगी ठरू शकतात.
(अस्वीकरण : हा लेख आचार्य चाणक्यांच्या नीतीविषयी प्रचलित विचार आणि सामान्य मान्यतांवर आधारित आहे. याची तथ्यात्मक किंवा ऐतिहासिक अचूकता स्वतंत्रपणे तपासलेली नाही.)
