Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी एका श्लोकामध्ये सांगितले आहे की, जेव्हा बाळ आईच्या गर्भात असते, तेव्हाच त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी ठरलेल्या असतात. चाणक्यांच्या मते, बाळाच्या जन्मापूर्वीच काही गोष्टी निश्चित होतात आणि त्या माणूस कितीही प्रयत्न केला तरी बदलू शकत नाही. वाचा आजची चाणक्य नीती.

श्लोक

आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च ।
पञ्चैतानि हि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः ।।

श्लोकाचा अर्थ

आचार्य चाणक्यांच्या मते, जेव्हा बाळ आईच्या गर्भात येते, तेव्हाच त्याचे आयुष्य, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी निश्चित होतात. चाणक्यांचे मत होते की, माणसाच्या आयुष्यात सुमारे १०१ वेळा मृत्यूचे योग येतात. त्यापैकी एक काळमृत्यू असतो, तर उर्वरित अकाली मृत्यूचे योग असतात. चांगल्या कर्मांमुळे अकाली मृत्यू टाळता येऊ शकतो.

श्लोकाचं सार

चाणक्यांच्या मते, माणसाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. जसे की, तो किती वर्षे जगेल, कोणत्या प्रकारचे कर्म करेल, त्याच्याकडे धन असेल की नाही, तो किती विद्या मिळवेल आणि त्याचा मृत्यू कसा होईल.

चाणक्य म्हणतात की, कर्माचे महत्त्व कधीही नाकारता येत नाही. असे मानले जाते की, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसारच शरीर मिळते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, माणसाचे पहिले कर्तव्य म्हणजे कर्म करणे. माणूस आपल्या बुद्धी आणि ज्ञानानुसार चांगले किंवा वाईट कर्म करतो. चाणक्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कर्म केले, तर त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात.

चाणक्य सांगतात की, जेव्हा जीव आईच्या गर्भात येतो, तेव्हाच त्याचे आयुष्य निश्चित झालेले असते. ते कोणालाही बदलता येत नाही. त्यांच्या मते, माणसाच्या आयुष्यातील सुख-दुःख हे त्याच्या कर्मानुसारच मिळते. चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ मिळते, तर वाईट कर्म करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एखाद्या व्यक्तीचे कर्म कसे असेल, हेही आईच्या गर्भात असतानाच निश्चित झालेले असते.

चाणक्यांच्या मते, माणसाच्या आयुष्याशी संबंधित आयुष्य, विद्या, धन, कर्म आणि मृत्यू या पाच गोष्टी मागील जन्मातील कर्मांच्या आधारावर आईच्या गर्भातच निश्चित होतात. या गोष्टी बदलणे अत्यंत कठीण, किंबहुना अशक्य मानले जाते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)