Dinner Date Goes Viral: न्यूयॉर्क सिटीतील एक डिनर डेट इतका विचित्र वळण घेईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. एआयमुळे डेटिंगमध्येही आता धक्कादायक ट्विस्ट येऊ लागले आहेत. २७ वर्षीय डेटिंग कोच ब्लेन अँडरसन एका चाळीशीच्या उत्तरार्धातील फायनान्स प्रोफेशनलसोबत डेटला गेली होती. सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटत होतं, पण काही वेळातच त्यांची डेट विचित्र होऊ लागली.

त्या व्यक्तीने जेवताना वारंवार मोबाईल काढला आणि ChatGPT वापरायला सुरुवात केली. कॉकटेल्सपासून ते रँडम ट्रिव्हिया फॅक्ट्सपर्यंत तो एआयने दिलेली उत्तरं मोठ्याने वाचत होता, पण समोर बसलेल्या महिलेशी साध्या गप्पा मात्र होत नव्हत्या. शेवटी ब्लेनने मजेतच त्याला टोमणा मारला, “तुला ChatGPTचं जरा जास्तच वेड आहे वाटतं.” इतकंच नाही तर त्याने मोबाईल तिच्या हातात दिला आणि म्हणाला, “माझ्याबद्दल काहीही विचार.”

एका प्रश्नाने उघड झाला मोठा धक्का

ब्लेनने गंमतीने ChatGPT ला विचारलं, “माझ्याबद्दल तुला असं काय आवडतं, जे तू कुणालाही सांगणार नाहीस?” याचं चॅटजीपीटीने दिलेलं उत्तर ऐकून दोघेही हादरले.
चॅटजीपीटी म्हणालं, “तू तुझ्या पत्नीचा किती काळजीवाहू नवरा आहेस आणि मुलांचा प्रेमळ वडील आहेस, हे मला खूप आवडतं.”

त्यावेळी ब्लेनला कळलं की, समोर बसलेला डेट आधीच विवाहित होता आणि त्याला मुलंही होती! ही गोष्ट त्याने डेटदरम्यान कधीच सांगितली नव्हती.

सोशल मीडियावर किस्सा व्हायरल

हा किस्सा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, “४० नंतर पुरुष जास्त क्यूट वाटतात म्हणे, पण यामागचं ‘सायन्स’ तरुण मुलींना माहीत नसतं!”

दुसरा युजर म्हणाला, “ही पूर्ण थ्रेड वाचून जगाबद्दल वाईट वाटतं. अविवाहित फायनान्सवाला चाळीशीतील पुरुष… किती दु:खद!”

तिसऱ्याने टोला लगावला, “लेट मी गुगल दॅट’ ऐवजी ‘लेट मी ChatGPT दॅट’ म्हणणं आणखीच वाईट ठरलं.”

आणखी एक भन्नाट कमेंट, “ChatGPT आता मोफत बॅकग्राऊंड चेक करतंय. तिनं पहिल्याच प्रश्नात हे विचारलं असतं, तर सगळ्यांचा वेळ वाचला असता!”