सेलिब्रिटी शेफ अशी ओळख असलेले संजीव कपूर हे त्यांच्या वैविध्यपूर्ण पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी YouTube चॅनलच्या माध्यमातून लोकांना विविध पाककृती शिकवल्या आहेत. संजीव कपूर हे त्यांच्या खास पाककृतींमुळे कायमच चर्चेत असतात. दरम्यान आता त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. २०१७ मध्ये त्यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारल्याचा हा किस्सा आहे.
कहानी खजाना व्हिडीओत सांगितली आठवण
‘कहानी खजाना’ नावाच्या एका व्हिडीओ सीरिजमध्ये २०१७ च्या आठवणी संजीव कपूर यांनी जागवल्या. संजीव कपूर म्हणाले मला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार होतं. मात्र माझी एक इच्छा अपूर्ण राहिल्याने मी पद्मश्री पुरस्कार नाकारला.
संजीव कपूर यांनी पद्मश्री पुरस्कार का नाकारला?
२०१७ मध्ये मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. त्यावेळी मी अशी विनंती केली की मला या कार्यक्रमासाठी शेफचा गणवेश घालून यायचं आहे. मात्र मला त्याबाबतची संमती मिळाली नाही. संजीव कपूर म्हणाले मी अनेक वर्षे हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केलं. त्यातला एकही दिवस असा नव्हता की मी गणवेश घातला नाही. शेफचा गणवेश माझ्यासाठी अभिमान आणि सन्मानाचं प्रतीक आहे. मी त्यावेळी शेफ म्हणून काम केलं म्हणून आजवर इतकी वाटचाल करु शकलो असंही संजीव कपूर म्हणाले. तसंच त्यांनी हेदेखील सांगितलं की पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी मी शेफचा गणवेश घालतो अशी संमती मागितली होती. ती मला मिळाली नाही त्यामुळे मी तो पुरस्कार नाकारला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

संजीव कपूर यांनी सरकारला केली होती विनंती
संजीव कपूर म्हणाले, ‘प्रोटोकॉल’ असल्याने मला पारंपारिक भारतीय कपड्यांमध्ये या असं सांगण्यात आलं. त्यावेळी मला हे वाटलं की मी जर शेफ म्हणून लोकांना माहीत आहे तसंच माझं कामच ते आहे त्यामुळे मला गणवेश घालून पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आवडेल. पण त्यांनी प्रोटोकॉलचं कारण दिलं आणि नकार दिला. ज्यावर मी त्यांना सांगितलं मला गणवेशात यायचं असेल तर पुरस्कार घ्यायला आवडेल अन्यथा पुरस्कार देऊ नका. त्यामुळे मी तेव्हा तो पुरस्कार घ्यायला नकार दिला होता.
अखेर ती विनंती मान्य झाली-संजीव कपूर
पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी येईन तर शेफच्या गणवेशातच येईन असं मी सरकारच्या प्रतिनिधींना सांगितलं. शेवटी माझं त्यांनी ऐकलं आणि मग मी शेफच्या गणवेशातच पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. मी जेव्हा राष्ट्रपती भवनात पोहचलो तेव्हा कुठल्याही प्रकारचा वाद न घालता मला त्यांनी शेफचा गणवेश घालण्यास संमती दिली आणि तो गणवेश घालूनच मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला.
