Girl Studying Under Street Light: आई कष्ट करत होती… तिच्यासमोर ग्राहकांची वर्दळ होती… आणि तिच्या अगदी शेजारी एक लहानगी मुलगी शांतपणे पुस्तक उघडून अभ्यास करत बसली होती. संध्याकाळ झाली, अंधार वाढू लागला; पण त्या मुलीचा अभ्यास थांबला नाही. पुढे तिनं जे केलं, त्यामुळे सोशल मीडियावरील लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आणि तिचा व्हिडीओ आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

हा हृदयस्पर्शी प्रकार चेन्नईतील तांबरम परिसरातील कॅम्प रोड सिग्नलजवळ घडला. रस्त्याच्या कडेला मुलीची आई फुलांचा छोटासा व्यवसाय करत होती. रोजच्या उदरनिर्वाहासाठी ती दिवसभर उन्हात आणि धुळीत उभी राहून फुले विकत होती. मात्र, तिची मुलगी आईच्या जवळच शांतपणे बसून पुस्तकात डोके खुपसून अभ्यास करत होती. आजूबाजूला वाहनांचा आवाज, लोकांची वर्दळ आणि गोंधळ असतानाही तिचे संपूर्ण लक्ष केवळ शिक्षणावर होते.

सूर्य मावळला, अंधार पडू लागला आणि परिसरातील प्रकाश कमी झाला. अनेकांना वाटले की, आता ही मुलगी घरी जाईल किंवा अभ्यास थांबवेल; मात्र तसे काहीच घडले नाही. अभ्यासाची जिद्द इतकी प्रबळ होती की, ती उठली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाजवळ जाऊन बसली. त्या दुकानातील दिव्याच्या प्रकाशात तिने पुन्हा पुस्तक उघडले आणि अभ्यास सुरू ठेवला.

हा क्षण तेथे उपस्थित असलेल्या संतोष नावाच्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये टिपला. त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना सांगितले की, कॅम्प रोड सिग्नलजवळ काम करीत असताना त्याच्या नजरेस हे दृश्य पडले. आई फुले विकत होती आणि तिची मुलगी शिक्षणाच्या जोरावर आपले आयुष्य बदलण्याच्या आशेने मन लावून अभ्यास करत होती. अंधार पडल्यानंतरही ती रस्त्यावरील दुकानाच्या प्रकाशात अभ्यास करत असल्याचे पाहून तो भारावून गेला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी या चिमुरडीच्या जिद्दीचे आणि तिच्या आईच्या कष्टांचे भरभरून कौतुक केले. काहींनी लिहिले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिकण्याची इच्छा असेल, तर कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही. तर काहींनी या आई-मुलीची कहाणी ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले.

या व्हिडीओची सर्वांत मोठी खासियत म्हणजे त्यातील साधेपणा आणि वास्तव. कोणताही दिखावा नाही, कोणताही अभिनय नाही… फक्त आईचे कष्ट आणि मुलीची शिक्षणासाठीची अविरत धडपड. म्हणूनच हा व्हिडीओ लाखो लोकांच्या मनाला भिडला.

विशेष म्हणजे सोशल मीडियावरील लोकांनी केवळ भावना व्यक्त करून थांबले नाहीत. अनेक मदतीचे हात पुढे आले. काहींनी त्या मुलीसाठी अभ्यासाचे टेबल, वह्या, लेखन आदी साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू देण्याची तयारी दर्शवली. तिच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा व्हावा, यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला.

आज हा व्हिडीओ केवळ एका मुलीच्या अभ्यासाचा नाही, तर शिक्षणासाठीची जिद्द, आईच्या कष्टांमधून उभी राहिलेली आशा आणि कठीण परिस्थितीतही स्वप्न पूर्ण करण्याची उमेद यांचं जिवंत उदाहरण ठरत आहे. म्हणूनच हा भावनिक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण एकच गोष्ट म्हणत आहेत. खरी श्रीमंती पैशात नसते, ती शिक्षणाची स्वप्नं पाहण्याच्या जिद्दीत असते.

येथे पाहा व्हिडीओ