Chennai homemaker earns Rs 250 per hour: घरकाम हा शब्द ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर गृहिणी येते जी स्वयंपाक करते, साफसफाई करते, कुटुंबाची काळजी घेते. घराकामाकडेअनेकदा फक्त महिलांची जबाबदारी म्हणून पाहिले जाते मात्र, या कामांसाठी लागणारा वेळ, मानसिक ताण आणि मेहनत याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. अनेकदा घर सांभाळणाऱ्या महिलांच्या श्रमांना आर्थिक मूल्य नसल्यासारखे वागले जाते. ज्या घरकामाला कमी लेखले जात होते तेच काम आता महिलांना पैसे कमावण्याची संधी देऊ शकते. त्यासाठी महिलांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन घरकाम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याच घरात रोजची कामे करत अनेक गृहिणी पैसे कमावू शकतात. चेन्नईतील एका गृहिणीने रोजच्या घरकामाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यातून पैसे कमावण्याचा मार्ग शोधला आहे. तिच्या या अनोख्या साइड जॉबमुळे एक नवा प्रश्न समोर आला आहे, ज्या कामांना पूर्वी कमी लेखलं जायचं, त्याच कौशल्यांचा वापर भविष्यात कमाईसाठी कसा होऊ शकतो? एआयच्या जगात मानवी अनुभव आणि दैनंदिन हालचालींचा डेटा आता मौल्यवान ठरत आहे.

आजकाल पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग शोधताना दिसतात. चेन्नईतील एका २५ वर्षीय गृहिणीची पैसे कमावण्यासाठी शोधलेले मार्ग पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. घरातील रोजची कामं करतानाच ही महिला तासाला तब्बल २५० रुपये कमावत आहे. विशेष म्हणजे, तिचं काम फक्त कॉफी बनवणे, फळं कापणे किंवा कपडे घडी घालण्यासारख्या नेहमीच्या घरकामाशी संबंधित आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियासाठी नसून AI कंपन्यांसाठी आहेत. या डेटाचा वापर ह्युमनॉइड रोबोट्सना माणसांसारखी घरातील कामं शिकवण्यासाठी केला जात आहे.

घरकामाचा व्हिडिओ बनवून कमाई (Earn money by making videos of housework)

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेची ओळख अद्याप समोर आलेली नाही. ही महिला आपल्या डोक्यावर स्मार्टफोन लावून रोजच्या घरकामाचे फर्स्ट-पर्सन व्हिडिओ रेकॉर्ड करते. म्हणजेच कॅमेऱ्यातून तिच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या गोष्टी शुट करता येतील अशा पद्धतीने कॅमेरा अँगल डोक्यावर सेट केला जातो आणि व्हिडिओ शुट केले जातात. हे व्हिडिओ नंतर एआय कंपन्यांना दिले जातात. या डेटाचा वापर ह्युमनॉइड रोबोट्सना (Humanoid Robots) माणसांसारखी घरातील कामं समजून घेण्यासाठी आणि शिकवण्यासाठी केला जात आहे.

रोबोट्सना शिकवण्यासाठी वापरला जातोय घरकामाचा डेटा ((Human movement data to teach robots)

एआय तंत्रज्ञानाच्या जगात सध्या रोबोट्सना वास्तविक वातावरणात काम करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे. माणूस वस्तू कशी उचलतो, हातांची हालचाल कशी करतो, स्वयंपाकघरात कसा वावरतो किंवा घरातील छोट्या-छोट्या गोष्टी कशा पूर्ण करतो, याचा अभ्यास करण्यासाठी अशा व्हिडिओ डेटाचा वापर केला जातो.

या महिलेच्या म्हणण्यानुसार, ती दिवसाला ९० पेक्षा जास्त छोटे क्लिप्स रेकॉर्ड करते. कॉफी बनवणे, फळं कापणे, कपडे घडी करणे यासारख्या अनेक रोजच्या कामांची नोंद या व्हिडिओंमध्ये केली जाते.

@VaibhavSisinty या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर चर्चा( (Discussion on social media)

या कामाची माहिती सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिलेने म्हटलं, “फक्त घरकाम करण्यासाठी तासाला २५० रुपये कोण देईल?” तिच्या या कमाईच्या पद्धतीवर काही लोकांनी कौतुक केलं, तर काहींनी भविष्यातील परिणामांवर प्रश्न उपस्थित केले.

डेटा विकण्यावरून वाद (Controversy over data selling)

एका यूजरने चिंता व्यक्त करत लिहिलं, “तिला माहिती आहे का की तिच्या या कामामुळे भविष्यात तिचा नवरा आणि मुलं बेरोजगार होऊ शकतात? आपण डेटा इतक्या स्वस्तात देऊ नये. लोकांना याबाबत माहिती देण्याची गरज आहे.” तर दुसऱ्या यूजरने म्हटलं, “ती हुशार असेल तर हे लाईव्ह स्ट्रीम करून यापेक्षा जास्त पैसे कमवू शकते.”

भविष्यातील कमाईचा नवा ट्रेंड? (New trend of future earnings?)

एआयच्या वाढत्या वापरामुळे डेटा तयार करणं ही देखील एक नवीन कमाईची संधी बनत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत लोक कौशल्य, वस्तू किंवा सेवा विकून पैसे कमवत होते; आता रोजच्या साध्या हालचाली आणि अनुभवातून तयार होणारा डेटा देखील मौल्यवान ठरत आहे.

चेन्नईतील या महिलेची कथा त्यामुळे फक्त एका साइड जॉबची नाही, तर भविष्यात माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यातील बदलत्या नात्याची झलक दाखवणारी ठरली आहे.