Chennai IT Company Employee Job Cut: आयटी क्षेत्रातील मंदी आणि कर्मचाऱ्यांची कपात हा सध्या जगभरात चिंतेचा विषय ठरत असताना चेन्नईतील एका नामांकित आयटी कंपनीतील मॅनेजरची व्यथा सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्यवस्थापनाने आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या १२ जुन्या सहकाऱ्यांना तातडीने कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर या मॅनेजरने ‘रेडिट’वर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
“हे लोक केवळ सहकारी नसून माझ्या कुटुंबासारखे आहेत,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संबंधित मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ व्यवस्थापनाने अचानक एका बंद खोलीत बैठक बोलावून त्याच्या हातात १२ नावांची यादी सोपवली. प्रत्येकाशी अवघ्या १५ मिनिटांची वैयक्तिक बैठक घेऊन शुक्रवारपर्यंत या सर्वांना कामावरून कमी करण्याचे निर्देश त्याला देण्यात आले.
“हे १२ लोक माझ्यासाठी केवळ कर्मचारी नाहीत. २०१६ पासून म्हणजेच तब्बल दहा वर्षे आम्ही दररोज एकत्र काम करत आहोत,” असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे. कठीण प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्री जागणे असो, एकत्र डबे खाणे असो किंवा एकमेकांच्या घरची लग्नकार्ये असो, सुख-दुःखात हे सहकारी नेहमी एकत्र राहिले. त्यांना कामावरून कसे कमी करू? असा प्रश्न मॅनेजरला सतावत आहे.
तमिळ भाषेत मोठा भाऊ या अर्थाने वापरला जाणारा ‘अण्णा’ हा शब्द ते या मॅनेजरसाठी अत्यंत आपुलकीने वापरत असत, अशी माहितीही मॅनेजरने दिली.
गंभीर कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी
ज्या सहकाऱ्यांना कामावरून काढण्यास सांगितले आहे, त्यांच्यासमोर सध्या मोठ्या आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी असल्याचे मॅनेजरने सांगितले. एका कर्मचाऱ्याने नुकतेच घरासाठी कर्ज काढले आहे, दुसऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी गरोदर असून पुढच्याच महिन्यात तिची प्रसूती होणार आहे; तर एका कर्मचाऱ्याची आई कर्करोगाशी लढा देत आहे. “त्याच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि कंपनीच्या ‘हेल्थ इन्शुरन्स’च्या आधारेच तिच्या उपचारांचा खर्च भागत आहे. अशा वेळी त्याची नोकरी गेली तर काय होईल?” अशी भीती त्याने व्यक्त केली.
‘राजीनामा देण्याचा विचार, पण…’
खर्च कपातीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. मात्र कर्मचाऱ्यांचा आक्रोश आणि भावनिक ताण सहन करण्याची वेळ ही मध्यम स्तरावरील व्यवस्थापकांवर ढकलली जाते, अशा शब्दांत त्याने कॉर्पोरेट संस्कृतीवर नाराजी व्यक्त केली. आपल्या सहकाऱ्यांना कामावरून काढण्यापेक्षा स्वतःच राजीनामा देण्याचा विचार त्याने केला होता; परंतु “तू राजीनामा दिलास तरी व्यवस्थापन दुसऱ्या कोणाकडून तरी हे काम करवून घेईलच,” अशी जाणीव त्याच्या पत्नीने करून दिल्याचे त्याने सांगितले.
“उद्या सकाळी ते मला ‘गुड मॉर्निंग, अण्णा म्हणतील…”
आपल्या सहकाऱ्यांना सामोरे कसे जायचे, हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कठीण भाग असल्याचे सांगताना मॅनेजरने लिहिले, “उद्या सकाळी ते कार्यालयात नेहमीप्रमाणे हसतमुखाने येतील आणि मला ‘गुड मॉर्निंग अण्णा’ म्हणतील. माझ्या कुटुंबाची चौकशी करतील. अशा वेळी त्यांना हे कटू सत्य कसे सांगायचे?”
आपल्याच माणसांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्याचे शल्य आणि अपराधीपणाची भावना कोणतीही मोठी पदवी किंवा पगार कधीच पुसून काढू शकत नाही, अशी खंत व्यक्त करत त्याने ही पोस्ट संपवली आहे.
