Shocking metro video: देशातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रो ही सर्वात सोयीची आणि वेगवान प्रवासाचे माध्यम मानली जाते. पण, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या मेट्रो सेवेत कधी तांत्रिक बिघाड झाला तर प्रवाशांसाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. चेन्नई मेट्रोमध्येही असेच काही घडले. ब्लू लाईनवरील एक ट्रेन अचानक टनेलमध्ये थांबली आणि अंधारात प्रवासी अडकले. काही वेळातच तणाव वाढला आणि प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून टनेलमधून पायी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

हा व्हिडीओ चेन्नई मेट्रोच्या ब्लू लाईनवरील तांत्रिक बिघाडावर आधारित आहे. विमानतळाकडे जात असलेली मेट्रो अचानक सेंट्रल मेट्रो आणि हायकोर्ट स्टेशनच्या मधल्या टनेलमध्ये अडकली. ट्रेनमधील वीजपुरवठा बंद झाल्याने कोचमध्ये पूर्ण अंधार झाला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. हाच संपूर्ण प्रसंग व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, प्रवासी कोचमधून स्वतः बाहेर पडत आहेत. अंधार असल्याने त्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च लावला आहे. टनेलच्या अरुंद मार्गातून लोक चालत बाहेरच्या दिशेने जाताना दिसतात. काही जण भीतीने पटापट चालत आहेत, तर काही जण शांतपणे रस्ता पाहत पुढे सरकत आहेत. अंदाजे अर्धा किलोमीटर अंतर पायी चालून ते टनेलच्या बाहेर पोहोचतात.

पाहा व्हिडिओ

प्रवाशांच्या चेहऱ्यावरची चिंता, कोचमधील अंधार, टनेलमधला धसका हे सगळं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं. काही प्रवाशांनी या वेळी एकमेकांना मदत करत बाहेर काढल्याचंही दृश्य आहे. व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी मेट्रो व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देत लोक म्हणाले, “अशा मोठ्या शहरात इतकी मोठी चूक कशी झाली?” तर एकाने म्हटले “टनेलमध्ये लाईटच गेली, प्रवाशांनी पायी चालत बाहेर येणं खूप धोकादायक आहे.” तर दुसऱ्याने म्हटले, “मेट्रोने सुरक्षेचे नियम कडक करायला हवेत.” तर तिसऱ्याने काळजी करत लिहिले, “प्रवाशांचा जीव वाचला हेच मोठं यश.”

काही प्रतिक्रियांमध्ये प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुकही केले गेले. अनेकांनी अशा परिस्थितीत लोकांनी धीराने स्वतःचा जीव वाचवला याबद्दल समाधान व्यक्त केले. मंगळवारी पहाटे ब्लू लाईनवरील मेट्रो अचानक टनेलमध्ये थांबली. काही वेळाने ट्रेनची लाईटही गेली. अंधार, गरम वातावरण आणि हलका आवाज, यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले. काही वेळ ट्रेन चालू होईल म्हणून लोक शांत बसले, पण काही मिनिटांनी परिस्थिती बिघडली, लोक घाबरू लागले.

लाईट नाही, काही घोषणा नाही आणि मदत कुठून येणार हेही माहीत नव्हतं. अखेर प्रवाशांनी स्वतः टनेलमध्ये उतरून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. अंदाजे दहा ते पंधरा मिनिटे चालत ते टनेलच्या बाहेर सुरक्षित पोहोचले. घटनेनंतर चेन्नई मेट्रो व्यवस्थापनाने सांगितले की, सेवेतली अडचण दूर करण्यात आली असून आता सर्व गाड्या सुरळीत सुरू आहेत.