स्वातंत्र्य मिळून अनेक दशकं उलटली; पण छत्तीसगडमधल्या काही गावांमध्ये देशाचे राष्ट्रीय सण कधीच साजरे होऊ शकले नाहीत. नक्षलवादाच्या भीतीमुळे तिरंगा फडकवणंही धाडसाचं वाटायचं; पण २६ जानेवारी २०२६ रोजी इतिहास घडला. छत्तीसगडमधील तब्बल ४१ गावांमध्ये पहिल्यांदाच गणतंत्र दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. ज्या भागांवर कधी काळी नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं, तिथे आज देशाचा तिरंगा अभिमानानं फडकताना दिसला. ही घटना केवळ एका सोहळ्याचं उदाहरण नसून, तो लोकशाहीचा विजय आहे.

हा व्हिडीओ छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त भागांमधील ऐतिहासिक क्षण दाखवून देतो. नक्षलवाद्यांचा किल्ला मानल्या जाणाऱ्या कर्रेगुट्टा डोंगरावर तिरंगा फडकवतानाच दृश्य, तसेच पहिल्यांदाच गणतंत्र दिवस साजरा करणाऱ्या गावांमधील उत्सव यात दाखविण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनचे जवान कर्रेगुट्टा डोंगरावर तिरंगा फडकवताना दिसतात. कधी काळी जिथे नक्षलवाद्यांची दहशत होती, त्या ठिकाणी आज देशभक्तीचं वातावरण आहे.

गावागावांत शाळकरी मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन झेंडावंदन करताना दिसतात. ढोल-ताशांचा आवाज, लहान मुलांचे देशभक्तीपर डान्स आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्हिडीओत स्पष्टपणे जाणवतो. बिजापूर, नारायणपूर व सुकमा या जिल्ह्यांतील गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं आणि साध्या, पण मनापासून साजऱ्या केलेल्या कार्यक्रमांची दृश्यं दिसत आहेत. अनेक गावकऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातला पहिलावहिला अनुभव होता.

पाहा व्हिडीओ

प्रतिक्रियांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर सैनिकांचं कौतुक करताना दिसतात. एकानं लिहिलं आहे “जवानांमुळेच आज हे शक्य झालं”. तर दुसऱ्यानं लिहिलं, “खऱ्या अर्थानं लोकशाही जिंकली”. “भारत बदलतोय” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. काही लोकांनी या गावांच्या विकासासाठी सरकारनं पुढील पावलं उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. तर, अनेकांनी “लाल आतंक संपतोय, हीच खरी देशसेवा” असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

छत्तीसगडमधील ४१ गावांमध्ये पहिल्यांदाच साजरा झालेला गणतंत्र दिवस हा केवळ एक उत्सव नाही, तर भीतीवर मात करून मिळवलेल्या स्वातंत्र्याचं ते प्रतीक आहे. नक्षलवाद्यांच्या छायेत राहिलेल्या गावांमध्ये आता विकास, शांती आणि लोकशाहीची नवी पहाट होताना दिसतेय.