Child Stops Slipping Car with a Stone, Prevents Major Accident: पावसाळ्यात डोंगररस्त्यांवरून प्रवास करताना अनेकदा चालकांना अधिक सतर्क राहावं लागतं. निसरडे रस्ते, तीव्र वळणं आणि उतार यांमुळे क्षणाचाही निष्काळजीपणा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. मात्र या व्हिडीओचं कारण कार किंवा अपघात नसून, एका लहान मुलानं दाखवलेलं प्रसंगावधान आहे.

घटना सुरू होते एका उताराच्या रस्त्यावर. पावसामुळे संपूर्ण रस्ता ओलसर आणि घसरडा झाला होता. एक कार उतार चढण्याचा प्रयत्न करीत होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्यासारखं वाटत होतं. पण, काही क्षणांतच कारचं नियंत्रण सुटलं आणि ती हळूहळू मागे सरकू लागली.

मागे इतर वाहनं उभी होती. रस्त्यावरही वर्दळ होती. कारचा वेग वाढला असता, तर काही क्षणांत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते. काय करावं, हे अनेकांना सुचत नव्हतं.

क्षणाचाही विलंब न करता घेतला निर्णय

याच वेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक चिमुकला संपूर्ण प्रसंग बारकाईनं पाहत होता. इतर जिथे फक्त परिस्थिती पाहत होते, तिथे या मुलानं क्षणाचाही विलंब न करता, कृती करण्याचा निर्णय घेतला.

त्यानं आजूबाजूला नजर टाकली आणि रस्त्याच्या कडेला पडलेला एक मोठा दगड उचलला. त्यानंतर तो वेगाने घसरत असलेल्या कारच्या मागे धावला.

एका दगडानं टळली मोठी दुर्घटना

कार अजूनही मागे सरकत होती. योग्य क्षण साधत त्या मुलानं तो दगड कारच्या मागील चाकामागे अडकवला. काही क्षणांतच कार थांबली आणि ती त्याच ठिकाणी स्थिर झाली.

हा संपूर्ण प्रसंग इतक्या वेगाने घडला की, आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनाही काही क्षण काय घडलं, हे समजलं नाही. मात्र पुढच्या क्षणी सर्वांनी सुटकेचा नि8श्वास सोडला.

सोशल मीडियावर चिमुकल्याचं कौतुक

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरील @Siya_189o या एक्स खात्यावर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून, अनेकांनी त्या मुलाच्या धाडसाचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे.

एका वापरकर्त्याने लिहिलं की, लहान वयातही एवढी समजूतदार कृती करणं खरंच कौतुकास्पद आहे. तर दुसऱ्याने म्हटलं की, योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णय किती मोठं संकट टाळू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

खरा हीरो कोण, हे या घटनेने दाखवून दिलं

या व्हिडीओने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. धाडस म्हणजे फक्त शक्ती नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. त्या चिमुकल्याने केवळ घसरणारी कार थांबवली नाही, तर संभाव्य दुर्घटना टाळण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.

म्हणूनच अनेक नेटकरी त्याला या घटनेचा ‘खरा हीरो’ म्हणत आहेत. एका क्षणात घेतलेल्या त्याच्या निर्णयामुळे किती मोठं नुकसान टळलं, याची कल्पना व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकालाच येते. अशी प्रसंगावधानाची उदाहरणं वयापेक्षा समज आणि धैर्य किती महत्त्वाचं असतं, याची जाणीव करून देतात.

येथे पाहा व्हिडीओ