प्रत्येक कंपनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्याचा विचार करत असते. कर्मचारी आनंदी असतील तर कामातही चांगला प्रभाव दिसून येतो. यासाठी जगभरातील अनेक कंपन्या वेगवेगळ्या पॉलिसी लागू करीत आहेत. जसे की, कर्मचाऱ्यांना पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी देणे. परंतु काही कंपन्या असे काही निर्णय घेतात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. काही वेळा कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही हस्तक्षेप करतात. चीनमधील अशीच एक कंपनी आहे जिने महिला कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला आहे. या कंपनीने आपले आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून महिला कर्मचाऱ्यांनी फॅमिली प्लॅनिंग केव्हा करावे याबाबत सुचवले आहे.
महिलांच्या हक्कांबाबत आणि विशेषत: अर्थव्यवस्थेतील योगदानाबाबत जगातील सर्वच देशांमध्ये धोरणे आखली जातात. महिलांना नोकरी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही देशांनी प्रसूती रजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण चीनमध्ये अशा काही कंपन्या आहेत, ज्या महिलांना गर्भवती राहण्यासाठी प्रतीक्षा करण्यास सांगत आहेत.




महिला कर्मचाऱ्यांनी वेळ पाहून करा फॅमिली प्लॅनिंग
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, चीनमधील एका कंपनीत योगायोगाने तीन महिला एकच वेळी गर्भवती राहिल्या, विशेष म्हणजे ही कंपनी सरकारी आहे. पण कंपनीतील तीन महिला एकाच वेळी गर्भवती असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली, ज्यानंतर त्यांनी तीनही गर्भवती महिला कर्मचाऱ्यांची एक मीटिंग घेतली. या वेळी कंपनीच्या कामात गैरसोय होऊ नये म्हणून तिघींनी वेगवेगळ्या वेळी गरोदर राहायला हवे होते असे सांगितले. तसेच तिघींनी प्रेग्नेंट राहणार असल्याचे एकमेकींना सांगायला हवे होते, आणि तिघींनीही अंतर ठेवून प्रेग्नेंट राहायला हवे होते.
या मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या गर्भवती महिलांमध्ये एकीचे वय २८, दुसरी आणि तिसरीचे वय ३७ असे होते. जेव्हा या तिघींना त्यांच्या प्रेग्नेंसी प्लॅनिंगबद्दल चर्चा करण्यासाठी मीटिंग बोलावल्याचे समजले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्यापैकी एकीने सोशल मीडियावर पोस्ट करीत या प्रकाराबाबत सांगितले, जी पोस्ट आता व्हायरल होत आहे. यावर सुमारे ११ हजार कमेंट्स आल्या आहेत. मुलगी म्हणून नोकरी मिळणे खूप अवघड आहे, अशी कमेंट एका महिलेने केली आहे.