China Flood Snakes Video : पुरामुळे केवळ सर्वसामान्य लोकांचेच आयुष्य धोक्यात येत नाही, तर त्यामुळे प्राणी आणि इतर निष्पाप जीवांचेही आयुष्य उद्ध्वस्त होते. सध्या भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यात अनेकांचा संसार पाण्यात बुडाला आणि अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पण, हीच स्थिती आता चीनमध्येही पाहायला मिळतेय. चीनमधील पुरात हजारो गाड्या रस्त्यावर वाहत आल्या, अनेकांच्या घरांत पाणी शिरले; तर दुसरीकडे वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला. पुरात शेकडो साप मानवी वस्तीत शिरले. याचा एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात जवळपास हजारो साप पुराच्या पाण्यात तरंगताना दिसतायत.
ही दुर्घटना दक्षिण चीनमधील ग्वांग्शी येथे घडलीय, ज्यात पुराच्या पाण्यामुळे घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने रहिवासी त्रस्त झालेत. तसेच आता हजारो साप एकत्र पुराच्या पाण्यात तरंगताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडीओत पाहू शकता की, पुराच्या पाण्यात रस्ता पूर्णपणे बुडाला आहे. अनेक गाड्या लोकांचे सामान यात वाहून जातेय. अशा परिस्थितीत हजारो साप पुराच्या पाण्यावर तरंगताना दिसतायत. अनेकांच्या घरांत हे साप शिरतायत. त्यामुळे लोकांमध्ये फार भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोक सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत.
पुरामुळे सापांच्या संख्येत वाढ होत असून, ते जागा मिळेल तिथे वाहून जाताना दिसत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला सापांचा विळखा पडला असून, लोकांना ते दंश करतायत. त्यात इथे लोकांना स्वत:हून साप पकडण्यास मनाई आहे. मग अशा परिस्थितीत बचावासाठी करावे तरी काय हे त्यांना सुचेनासे झाले आहे.
या सापांमध्ये किंग कोब्रा, किंग रॅट व पाणसाप अशी तीन प्रजातींचा समावेश आहे. या सापांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. पुराचा हा व्हिडीओ @lvjin1993 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
