Seven Stolen Dogs Brave Escape Viral Video: सात लहान-मोठ्या कुत्र्यांचा झुंड, धावत, खेळत बागडत रस्त्यावरुन जात आहे. या सात कुत्र्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओ समाधानकारक वाटत असता तरी त्यामागील कहाणी धाडसी आणि थक्क करणारी अशीच म्हणावी लागले. चोरट्यांच्या तावडीतून फरार होत या कुत्र्यांनी थेट मालकाचे घर गाठले आहे. विशेष बाब म्हणजे या पाळीव कुत्र्यांनी तब्बल १७ किलोमीटर प्रवास करत मालकाचे घर गाठल्याचे दावा केला जात आहे. चीनमधला हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात असून, सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

चोरट्याच्या ट्रकमधून पलायन

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जिलीन प्रांतातील, चांगचुन महामार्गावरील हा व्हिडीओ आहे. सातही पाळीव कुत्र्यांचे चोरट्यांनी अपहरण केले होते. पण, धाडसी कुत्र्यांनी चोरट्याच्या कचाट्यातून फरार होत मालकाच्या घरचा रस्ता धरला. सर्व कुत्री चोरट्यांच्या ट्रकमधून बाहेर पडून रस्त्यावर उतरले. थेट १७ किलोमीटर मालकाच्या घराच्या दिशेन जाऊ लागले असा दावा व्हायरल व्हिडीओतून केला जात आहे. 

व्हिडीओ व्हायरल

कुत्र्यांच्या कळपात एक जखमी जर्मन शेफर्ड, एक कॉर्गी, गोल्डन रिट्रीव्हर, लॅब्राडोर आणि पेकिनीज कुत्र्यांचा समावेश होता. लू नावाच्या एक व्यक्तीने सर्व कुत्री रस्त्याने जात असल्याचे पाहिले. लू यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरुन जाताना त्यांना रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला पण, कुत्र्यांना त्याकडे दुर्लेक्ष करुन पुढे रस्ता चालत राहिले”. लू ने व्हिडीओ शेअर करुन प्रशासनाला मदतीचे आवाहन केले.

मालकाच्या घरी सुखरुप परतली

लू चा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. अनेक नेटकऱ्यांनी त्याला पुन्हा सोशल खात्यांवर शेअर करत व्हायरल केला. यानंतर स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाने देखील याची दखल घेतली. यानंतर पाळीव कुत्र्यांना मूळ मालकाच्या घरी सुखरुप परतण्यास मदत केली. सोळा मार्च रोजी कुत्र्यांनी ट्रकमधून पलायन केले आणि १८ मार्च रोजी ते मालकाच्या घरी पोहोचले असे सांगितले जाते. चीनमध्ये कुत्र्यांची चोरी गंभीर गुन्हा मानला जोता. यात दंड आणि तुरुंगवासाची शिक्षेचा समावेश आहे.

नेटकऱ्यांकडून भावनिक प्रतिक्रिया

कुत्र्यांचे मांस विक्री करणाऱ्यांनी या सात पाळीव कुत्र्यांचे अपहरण केले होते, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्व सात कुत्री एकाच मालकाची नव्हती आसपासच्या तीन वेगवेगळ्या घरातील होती, असेही या वृत्तात म्हटले आहे. सोशल मीडियावर या कुत्र्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, त्याला लाखो व्हि्यूज मिळाल्या आहेत. नेटकरी यावर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत.