Chinese Baby Hanuman Chalisa Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चिनी महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेत राहणारी सारा जेन हो आपल्या बाळाच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगताना अशी गोष्ट शेअर करते, जी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. बाळ रडायला लागलं की सारा त्याला शांत करण्यासाठी हनुमान चालीसा म्हणते असं तिने म्हटलं आहे.
साराने आपल्या मातृत्वातील काही अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये बाळाला शांत करण्यासाठी ती वापरत असलेल्या एका खास पद्धतीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ती सांगते की, बाळ रडायला लागले की ती हनुमान चालीसा म्हणते किंवा ऐकवते. तिच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर बाळ काही क्षणांत शांत होते.
हनुमान चालीसा तिला कुठून माहीत झाली?
साराने हनुमान चालीसा तिला कशी माहीत झाली, याचाही किस्सा सांगितला आहे. ‘बर्निंग मॅन’मध्ये तिच्या काही भारतीय मित्रांकडून तिने हनुमान चालीसा ऐकली होती. हे भक्तिगीत तिला खूप शांत आणि सुखद वाटले. त्यानंतर तिच्या दैनंदिन आयुष्यातही त्याचा वापर होऊ लागला.
बाळ ५ सेकंदांत शांत होतं आणि २ मिनिटांत झोपतं?
साराच्या म्हणण्यानुसार, बाळ रडत असताना हनुमान चालीसा सुरू केल्यानंतर ते अवघ्या काही सेकंदांत शांत होतं. ती सांगते की, काही वेळातच बाळ झोपीही जातं. त्यामुळे आता बाळाला शांत करण्यासाठी हनुमान चालीसा हा तिच्या दिनचर्येचा एक भाग झाला आहे. साराचा आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. बाळ रडत असेल तर त्याला फक्त रडू देण्याऐवजी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं ती सांगते. प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि त्याला शांत करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात, असा तिच्या अनुभवाचा सूर आहे.
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
साराच्या @sarajaneho या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी तिच्या बाळाच्या क्यूटनेसचं कौतुक केलं आहे, तर काहींनी संगीतामुळे बाळ शांत होऊ शकतं, असं म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं, “तुमचं बाळ खूप गोंडस आहे.” तर दुसऱ्याने सांगितलं की, संगीत ऐकल्याने अनेकदा बाळं शांत होतात. आणखी एका युजरने बाळाचं कौतुक करताना ते झोपलेलं असताना आणखी गोंडस दिसत असेल, अशी प्रतिक्रिया दिली.
हनुमान चालीसा ही एका चिनी-अमेरिकन महिलेच्या बाळाला शांत करण्याच्या दिनचर्येचा भाग बनल्याने या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
