कोल्ड ड्रींक्स म्हणजेच शितपेय आवडणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का? तसं जगभरामध्ये खास करुन ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये शितपेय हे रोजच्या जेवणाचा भाग आहे. अनेक देशांमध्ये लोक रोज काही लीटरची शितपेयं आरामात पितात. मात्र असं असतानाच आता चीनमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा फारच जास्त प्रमाणात शितपेय प्यायलाने मृत्यू झालाय. मरण पावलेल्या मुलाने १० मिनिटांमध्ये दीड लीटर कोका कोला प्यायल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात शितपेय प्यायल्याने या मुलाच्या शरीरामध्ये गॅसचं प्रमाण वाढलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेल्या व्यक्तीने १० मिनिटांमध्ये दीड लीटर कोका कोला संपवला होता. या २२ वर्षीय तरुणाने दीड लीटर कोका कोला संपवल्याचं सांगण्यात येतं. या मुलाच्या नावाचा खुलास करण्यात आलेला नसला तरी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कोबीजिंग के चाओयांग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणे शितपेय प्यायल्यानंतर अवघ्या १८ तासांमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला.

सध्या चीनमध्ये उष्णतेची लाट आलीय. त्यामुळेच गर्मीने हैराण झालेल्या या तरुणाने दीड लिटरची कोका कोलाची बाटली विकत घेतली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्याने ती संपवली. अचानक त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली आणि त्याचा रक्तदाब कमी झाला. त्यानंतर तो जोरजोरात श्वास गेऊ लागला. त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे सर्व सहा तासांमध्ये घडलं आणि कोक प्यायल्यानंतर १८ तासांच्या आत या मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी या मुलाच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस साठून राहिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय.

क्लिनिक अॅण्ड रिसर्च इन हेप्टोलॉजी अॅण्ड गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कमी वेळात अधिक प्रमाणात शितपेय प्यायल्याने या तरुणाच्या आतड्यांमध्ये गॅस साचून राहिला. तसेच पोटामधील त्याच्या इतर अन्ननलिकेमध्येही गॅस साचला. मोठ्या प्रमाणात गॅस शरिरात साचून राहिल्याने त्याच्या लिव्हरला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पोटाचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. डेली मेलने छापलेल्या या खालील फोटोमध्ये बाण दिसत आहेत त्या ठिकाणी गॅस साठून राहिल्याने या मुलाची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात येतंय.

मात्र दुसरीकडे हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं जात आहे. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये लंडन विद्यापिठातील प्राध्यापक नॅथन डेव्हीस यांनी दीड लीटर कोका कोला प्यायल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा वैद्यकीय शास्त्रानुसार न पटणारा असल्याचं म्हटलंय.