आपल्या समाजात खूप वर्षांपासून शिक्षणाबाबत काही ठरलेले विचार आहेत. त्यातला सगळ्यात मोठा विचार म्हणजे चांगलं शिक्षण फक्त खासगी शाळेतच मिळतं. त्यामुळे सरकारी शाळा, अंगणवाडी आणि सरकारी शिक्षणाकडे लोक फारसं लक्ष देत नाहीत. बहुतेक पालक आपल्या मुलांसाठी भरपूर पैसे खर्च करायला तयार असतात; पण सरकारी शाळांवर विश्वास ठेवायला घाबरतात.
कधी शाळांमध्ये सुविधा कमी असल्यामुळे कधी जुन्या-वाईट अनुभवांमुळे, तर कधी सोशल मीडियावर दिसणाऱ्या नकारात्मक व्हिडीओंमुळे ही भीती लोकाना वाटत असते. पण, आता हळूहळू चित्र बदलत आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होत आहेत, सुविधा वाढत आहेत आणि काही जबाबदार अधिकारी स्वतः पुढे येऊन लोकांसमोर चांगलं उदाहरण ठेवत आहेत.
उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्याचे डीएम पुलकित गर्ग यांनी आपल्या कृतीतून सरकारी शिक्षण व्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा प्रवेश थेट सरकारी अंगणवाडीमध्ये करून दिला. कर्वीच्या नवीन बाजार येथे असलेल्या एका सरकारी शाळेशी जोडलेल्या अंगणवाडीच्या प्ले-ग्रुपमध्ये ते स्वतः गेले आणि सगळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
त्यांनी असंही सांगितलं की, आता सरकारी शाळांची परिस्थिती आधीसारखी राहिलेली नाही. शिक्षणाची गुणवत्ता सुधारली आहे आणि सुविधादेखील चांगल्या झाल्या आहेत. “जर एक IAS अधिकारी आपल्या मुलीला सरकारी अंगणवाडीमध्ये शिकवू शकतो, तर सामान्य पालकांनीही घाबरायची गरज नाही,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, लहान वयात मुलांसाठी शिक्षणाइतकंच पोषण, आरोग्य, सुरक्षित वातावरण आणि चांगले संस्कार खूप महत्त्वाचे असतात आणि अंगणवाडी हे काम नीट करत आहेत.
पाहा व्हिडीओ
प्रवेशानंतर सिया वर्गातील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होताना दिसत आहे. ती खेळणी खेळताना, शिकवल्या जाणाऱ्या अॅक्टिव्हिटीज करताना आणि इतर मुलांसोबत कवितांवर नाचताना दिसते. तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अनेक लोक तिचं आणि डीएम गर्ग यांच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत.
या व्हिडीओखाली सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक लोकांनी पुलकित गर्ग यांच्या निर्णयाचं मनापासून कौतुक केलं आहे आणि त्यांना “खरा प्रशासकीय आदर्श” म्हटलं आहे. काही पालकांनी तर या घटनेनंतर सरकारी शाळांकडे पाहण्याचा आपला विचार बदलल्याचंही सांगितलं आहे. जेव्हा मोठे अधिकारी स्वतः आपल्या मुलांसाठी सरकारी शाळा आणि अंगणवाडीवर विश्वास ठेवतात, तेव्हा सामान्य लोकांनाही धीर मिळतो.

