चीनमधलं चोंगक्विंग हे शहर आपल्या हटके तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. या शहराची लोकसंख्या प्रचंड आहे. तेव्हा इथे इमारतीही खूप आहेत. इथल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून  इंजिनिअर्सने इथे एकापेक्षा एक अशी सरस वाहतूक व्यवस्था निर्माण केलीय. मग ते पाच मजल्याच्या इमारतीवरून रस्ता तयार करणं असो किंवा इमारतीमधून रेल्वे ट्रॅक काढणं असो.. आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाने त्यांनी सगळ्यांना थक्क केलंय. पण कधी कधी याचा त्रासही होऊ शकतो. आता हेच पाहा ना ज्या १९ मजल्यांच्या इमारतीमधून रेल्वे ट्रॅक जातो त्या रेल्वे ट्रॅकवर एका क्षुल्लक कारणामुळे जवळपास एक तास रेल्वे ट्रॅकवर थांबून होती.

त्याचं झालं असं या इमारतीतून रेल्वे ट्रॅक जात असला तरी संपूर्ण इमारतीत लोक राहतात. त्यातल्या एका घरातून वाळत घातलेली चादर खाली पडली आणि ही चादर नेमकी रेल्वे ट्रॅकवर पडली. तेव्हा मोटरमनला ट्रेन काही पुढे नेता येईना. बरं ही ट्रेन अशा ठिकाणी थांबली होती की जिथून ट्रॅकवरची ही चादर दूर करणं शक्य नव्हतं. तेव्हा बिचाऱ्या मोटरमनला वाट पाहण्यावाचून गत्यंतर नव्हती. सोसाट्याचा वारा येईल आणि रेल्वे ट्रॅकवरची ही चादर दूर उडेल अशी आशा बिचाऱ्याला होती. पण ते काही शक्य झालं नाही. शेवटी बिचाऱ्याने कशी बशी शक्कल लढवत ही चादर ट्रॅकवरून दूर केली. पण यामुळे एक तास  वाहतुकीचा खोळंबा झाला.