fact check of female protester death at Jantar Mantar : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सरकारविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी)चे आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. यादरम्यान सोमवारी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले, त्यामुळे याबद्दल संताप व्यक्त करत देशातील विविध भागांतील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान अनेक व्हिडीओ, पोस्ट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लाइटहाऊस जर्नालिझमच्या निदर्शनास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाणारी एक पोस्टसुद्धा आढळली. या पोस्टमध्ये एका तरुणीचा फोटो आहे आणि असा दावा करण्यात आला होता की, या फोटोमध्ये दिसणाऱ्या तरुण महिला आंदोलकाचा २० जुलै रोजी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे.

पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हायरल दावा खोटा आहे. कारण कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या महिला विद्यार्थी आंदोलकावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर @nandednews_live ने खोट्या दाव्यासह ही व्हायरल पोस्ट शेअर केली आहे.

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह ही पोस्ट शेअर करत आहेत.

https://www.facebook.com/photo/?fbid=122222835068335818&set=pob.61560074548441

https://www.youtube.com/post/UgkxZVv4lCasU95KmFtcPiHzwhSMi9PlxtHO

https://www.youtube.com/post/UgkxBvuzhfXXJz5O_g2sfn9HquAqIoHWKc1g

https://www.youtube.com/post/UgkxEc9DPZRXQFVF7zduYTz11bbvjQQFmVp7

https://www.facebook.com/groups/408350382176022/posts/1085593331118387

तपास…

आम्ही एक कीवर्ड गूगलवर सर्च करून तपास करायला सुरुवात केली. पण, २० जुलै रोजी नवी दिल्लीत झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान एका महिला विद्यार्थी आंदोलकाचा मृत्यू झाल्याचे सुचवणारी कोणतीही विश्वसनीय बातमी आम्हाला आढळली नाही.

त्यानंतर आम्ही एक्स (ट्विटर)वरदेखील कीवर्ड सर्च केले. यामुळे आम्हाला दिल्ली पोलिसांच्या अधिकृत हँडलवरील एका पोस्टची माहिती मिळाली.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही विद्यार्थिनी जिवंत असून सध्या राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात दाखल आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली असून, ती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे.

आम्ही सुरू असलेल्या आंदोलनाचे कव्हरिंग करणाऱ्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’ (The Indian Express) च्या टीमशीदेखील संपर्क साधला. टीमने आम्हाला माहिती दिली की, महिला विद्यार्थी आंदोलक जिवंत असून तिची प्रकृती स्थिर असून ती बरी होत आहे.

निष्कर्ष

२० जुलै रोजी जंतर-मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या महिला विद्यार्थी आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ती जिवंत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली आहे. आंदोलनाचे कव्हरिंग करणाऱ्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या टीमनेही ही महिला विद्यार्थिनी जिवंत असल्याचे स्पष्ट केले आहे