Class 4 Student Interviews CM Devendra Fadnavis Video Goes Viral: राजकारणातील अनुभवी नेत्यांना कठोर प्रश्न विचारले जातात, पत्रकार परिषदांमध्ये अवघड प्रश्नांचा भडिमार होतो आणि अनेकदा नेत्यांनाही त्याची तयारी ठेवावी लागते. मात्र, रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा शाळेत घडलेला प्रसंग पूर्णपणे वेगळा होता. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभी होती एक चुणचुणीत चौथीतील विद्यार्थिनी आणि तिच्या प्रश्नांनी अखेर मुख्यमंत्र्यांनाही भारावून टाकलं.

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत आले होते. डिजिटल प्रयोगशाळेचे उद्घाटन, विद्यार्थ्यांशी संवाद आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग, असे कार्यक्रम सुरू होते. मात्र, याच कार्यक्रमात घडलेला एक छोटासा प्रसंग आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

इयत्ता चौथीत शिकणारी यशश्री मिठू घुले हिला मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. शिक्षिका साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली यशश्री आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांसमोर उभी राहिली. मुलाखतीला सुरुवात होताच मुख्यमंत्री हसत म्हणाले, “सोपे प्रश्न विचार बरं का…”

हे वाक्य ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, पुढच्या काही मिनिटांत यशश्रीने विचारलेले प्रश्न पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले.

तिने सर्वप्रथम अगदी निरागसपणे विचारलं, ‘सर, आपलं नाव काय’ या प्रश्नावर मुख्यमंत्रीही हसले आणि त्यांनी प्रेमानं उत्तर दिलं. त्यानंतर मात्र यशश्रीनं थेट त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली.

‘तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली’ या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी चळवळीतून सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवत-सोडवत नेतृत्वाची वाट कशी खुली झाली, हे त्यांनी सोप्या शब्दांत सांगितलं.

त्यानंतर यशश्रीचा पुढचा प्रश्न आणखी लक्षवेधी ठरला. “तुमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी आव्हानं कोणती होती आणि त्यावर तुम्ही कशी मात केली,” असा प्रश्न तिनं विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संदर्भ देत संघर्ष, चिकाटी आणि समाजसेवेचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं.

डिजिटल युगाशी संबंधित प्रश्नही यशश्रीनं विचारला. शिक्षण क्षेत्रात कोणते बदल व्हावेत, असं विचारताच मुख्यमंत्र्यांनी डिजिटल शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांनी सांगितलं की, आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे शिक्षणाची नवी दारं खुली झाली आहेत आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा.

मात्र, मुलाखतीचा शेवट सर्वाधिक संस्मरणीय ठरला. यशश्रीने विचारलं, “तुमच्या आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे, जो तुम्हाला कायम प्रेरणा देतो?”

क्षणभर विचार करून मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले, “माझ्या आयुष्यात अनेक अनुभव आहेत, पण आज तू घेतलेली ही मुलाखत माझ्या कायम लक्षात राहील.”

हे उत्तर ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चौथीतील एका विद्यार्थिनीनं आत्मविश्वासानं घेतलेली मुलाखत आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची दिलखुलास प्रतिक्रिया याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

अनेक नेटकऱ्यांनी यशश्रीच्या आत्मविश्वासाचे कौतुक केलं असून, काहींनी ‘हीच खरी नव्या पिढीची ताकद’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका छोट्याशा शाळेत घडलेला हा प्रसंग आज हजारो लोकांच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित हसू आणत आहे.

येथे पाहा व्हिडीओ