Clat 2026 geetali gupta video: कष्ट करा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा; या तिन्ही गोष्टी एकत्र असतील तर यश नक्कीच मिळतं, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. CLAT २०२६ चा निकाल जाहीर होताच राजस्थानमधील श्रीगंगानगरची १७ वर्षांची गीताली गुप्ता संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. तिला पहिला क्रमांक मिळाल्यामुळे नाही, तर त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर दिसलेली खरी भावना, डोळ्यातले अश्रू आणि देवापुढे नम्रपणे लीन झालेला तिचा भाव, यामुळे तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

तिची साधी, शांत आणि मनाला स्पर्श करणारी ही प्रतिक्रिया अनेक लोकांना भावली आहे. हा व्हायरल व्हिडीओ CLAT २०२६ चा निकाल पाहतानाचा आहे. गीताली गुप्ताने या परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक १ पटकावत ११९ पैकी ११२.७५ गुण मिळवले आहेत. तिच्या कोचिंग क्लासेसने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये गीताली घरातल्या छोट्या देवघरासमोर जमिनीवर बसलेली आहे. तिच्या हातात मोबाईल आहे आणि CLAT चा निकाल फोनवर दिसण्याची ती वाट पाहत आहे. निकाल उघडताच काही क्षण तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. गुण दिसताच तिचा चेहरा बदलतो, डोळ्यांत पाणी येतं आणि ती भावूक होते.

अचानक ती रडू लागते; हे रडणं अपयशाचं नाही, तर आनंदाश्रू आहेत. त्याचक्षणी तिची आई तिला घट्ट मिठी मारते. आई-लेकीचा तो क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले. गीताली हात जोडून देवाकडे पाहते, जणू ती सगळं श्रेय त्याच्याच चरणी अर्पण करत आहे. हा साधा पण अतिशय भावनिक क्षण लोकांच्या मनात घर करून गेला.

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी गीतालीवर कौतुकाचा वर्षाव केला. अनेकांनी तिच्या कष्टांना सलाम केला. एका युजरने लिहिलं, “खरा विजेता असाच असतो.” दुसऱ्याने म्हटलं, “तिने मंदिराकडे बोट दाखवलं तो क्षण फारच भावूक आहे, मेहनत करून सगळं देवावर सोपवणं म्हणजे खरं यश.” तर काहींनी तिच्या आईचंही कौतुक केलं आणि “आईची मिठी म्हणजे सगळ्यात मोठं बक्षीस” अशा प्रतिक्रिया दिल्या. अनेक पालक आणि विद्यार्थीही या व्हिडीओखाली आपल्या भावना व्यक्त करत आहेत. “ही मुलगी लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे,” अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.