आजच्या काळात अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहता. नोकरी करून आपले भविष्य सुरक्षित करणे एवढीच काय ती त्यांची अपेक्षा असते. पण कॉर्पोरेट जगात आल्यानंतर कळते वास्तव फारच वेगळे आहे. ऑफिस पॉलिटिक्स, कंपन्या पॉलिसीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण हे पाहिल्यानंतर अनेक तरुणांची निराशा होते. घर, गाडी, हौस मोज पुर्ण करण्याचे स्वप्न पाहणारे हे कर्मचारी कामाचा ताण, ऑफिस पॉलिटिक्स आणि कंपन्याच्या पॉलिसीच्या दबावाखाली दाबले जातात. नोकरदार वर्गाला असे बरेच चांगले वाईट अनुभव येतात कोणी त्यांना तोंड देण्याचा प्रयत्न करते, कोणाला नक्की काय करावे कळत नाही तर काही लोक सोशल मीडियावर आपले अनुभव मांडताना दिसतात. अशाच एका अनुभवाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
अनेक कंपन्या इंटर्न्सकडून पूर्णवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करून घेतात. मात्र, स्टायपेंड देण्याच्या वेळी परफॉर्मन्सचा मुद्दा पुढे करून पैसे रोखण्याचे प्रकार समोर येत आहेत. जयपूरमधील एका MBA विद्यार्थिनीने अशाच अनुभवाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून, तिची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
‘परफॉर्मन्स चांगला नसेल तर स्टायपेंड मिळणार नाही’ (Stipend withheld over performance)
श्रुती नावाच्या विद्यार्थिनीने X वर पोस्ट करत सांगितले की, ती ज्या कंपनीत तीन महिन्यांपासून इंटर्नशिप करत होती, त्या कंपनीने तिचे स्टायपेंड रोखण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून तिला सांगण्यात आले की, तिच्या परफॉर्मन्सवर कंपनी समाधानी नसल्यामुळे पूर्ण स्टायपेंड दिले जाणार नाही. रफॉर्मन्स सुधारल्यास काही रक्कम दिली जाऊ शकते.
श्रुतीच्या मते, “स्टायपेंड देण्याचा करार कधीही परफॉर्मन्सशी संबधीत नव्हता. इंटर्नशिप संपण्यास अवघे दोन आठवडे शिल्लक असताना अचानक हा निर्णय कळवल्याने ती हादरली.
‘१५ हजारां रुपयांसाठी तीन महिने केली मेहनत’ (Three months of work for ₹15,000)
संपूर्ण इंटर्नशिप कालावधीसाठी तिला १५ हजारां रुपये स्टायपेंड मिळणार होते. म्हणजेच दरमहा केवळ ५ हजार रुपये. श्रुतीने सांगितले की, “MBA शिक्षणासह घरभाडे आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ती या पैशांवर अवलंबून होती.”
खर्च कमी करण्यासाठी ती काही महिन्यांपासून नातेवाईकांकडे राहत होती. इतकेच नाही, तर फेब्रुवारीपासून जवळजवळ दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत काम केल्याचा दावाही तिने केला.
‘मी परिपूर्ण नसले तरी इतकी शिक्षा का?’ (Why such punishment for an intern?)
कंपनीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत श्रुतीने म्हटले की, “कदाचित मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. पण कंपन्या इंटर्न्सकडून महिनोमहिने पूर्णवेळ काम करून घेतात आणि नंतर एवढ्या कमी स्टायपेंडसाठीही असा गोंधळ घालतात?”
तिने आणखी सांगितले की, इंटर्नशिपदरम्यान तिची सतत अधिक अनुभवी आणि वयाने मोठ्या इंटर्न्सशी तुलना केली जात होती. त्यामुळे मानसिक तणाव वाढल्याचेही तिने नमूद केले.
‘पूर्णपणे पराभूत झाल्यासारखे वाटत आहे’ (Feeling completely defeated)
या संपूर्ण प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या खचल्याचे श्रुतीने पोस्टमध्ये म्हटले आहे. “मला सध्या सहनशक्ती संपल्यासारखे, असहाय्य आणि पूर्णपणे पराभूत झाल्यासारखे वाटत आहे,” असे तिने लिहिले.
तिच्या पोस्टवर अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली. काहींनी कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी थेट कंपनीशी चर्चा करून नेमका मुद्दा समजून घेण्याचा सल्ला दिला.
‘५ हजार रुपयांसाठी मी जीव देऊ का?’ (Should I sacrifice myself for ₹5,000?)
एका युजरने “कंपनीच्या अपेक्षा जास्त असतील, त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवा,” असा सल्ला दिल्यावर श्रुतीने संतप्त प्रतिक्रिया दिली. “५ हजार रुपयांसाठी मी जीव देऊ का?” असे तिने प्रत्युत्तरात म्हटले.
इंटर्न्सच्या हक्कांवर पुन्हा चर्चा (Debate over interns’ rights)
या घटनेनंतर सोशल मीडियावर इंटर्न्सच्या कामाच्या अटी, कमी स्टायपेंड आणि कंपन्यांकडून होणाऱ्या कथित शोषणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी कंपन्यांनी इंटर्न्सना ‘स्वस्त मजूर’ समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
