देशात मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा इंधनदरवाढ झाली आहे. आज सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. असं असतानाच आज संसदेच्या आवरामध्ये काँग्रेसचे आमदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केलं. मात्र त्यापूर्वी म्हणजेच बुधवारीच काँग्रेसच्या एका अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेली मागणी चांगलीच चर्चेत आली असून व्हायरल झालीय. या मागणीमध्ये काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर उपहासात्मक पद्धतीने टोला लगावत पेट्रोलचं नाव बदलण्याची विनंती केलीय.
नक्की वाचा >> …अन् राहुल गांधींनी जमिनीवर पडलेल्या मोटरसायकलला घातला हार
झालं असं की छत्तीसगड काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटला काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा संदर्भ आहे. पेट्रोलचे दर हे सतत वाढत असून ते कमीही होत नाहीत आणि थांबतही नाहीयत त्यामुळे पेट्रोलचं नाव बदलून पुष्पा करण्यात यावं असं काँग्रेसने म्हटलंय. “पेट्रोलचं नाव बदलून पुष्पा केलं पाहिजे, कारण ते (त्याचे दर) वाकतही नाहीत (कमी होत नाहीत) आणि (दरवाढ) थांबतही नाहीय,” असं छत्तीसगड काँग्रेसने म्हटलं आहे. सोशल मीडियावर हे ट्विट तुफान व्हायरल झालं असून त्याला हजारोंच्या संख्येने रिट्विट आहेत.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: पेट्रोल-डिझेलपेक्षा फारच स्वस्त… गडकरींच्या Hydrogen कारचं Average पाहिलं का?
दरम्यान, आज दिल्लीमध्ये संसदेच्या आवारात काँग्रेसने केलेल्या आंदोलनामध्ये गॅसची दरवाढ मागे घ्या, गरीबांना लुटणं बंद करा, महागाई वाढवणं बंद करा, मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी अशापद्धतीच्या घोषणा देत इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळेस काँग्रेस खासदारांच्या हातामध्ये २०१४ मधील इंधनाचे दर आणि आताचे दर दाखवणारे पोस्टर्सही होते. तसेच ‘निवडणूक संपली, लूट सुरु झाली,’ अशा अर्थाचे पोस्टर्सही खासदारांनी पकडले होते.
नक्की वाचा >> पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये; दरांमधील फरक पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
“आमच्या काँग्रेसचे खासदार आणि वेगवेगळ्या राज्यांमधील नेते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आलाय. याचा थेट फटका गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “आमची मागणी आहे की ही दरवाढ होतेय त्यावर सरकारने नियंत्रण आणावं आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ रोखावी. सरकार या पैशांमधून हजारो कोटींची कमाई करत आहे,” अशी टीका राहुल यांनी यावेळी केली.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज (३१ मार्च २०२२ रोजी) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.
