भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. ते सध्या इंदूरमध्ये जोरदार प्रचार करीत आहेत. याचदरम्यान त्यांचा पूर्वीचा अंदाज पाहायला मिळाला. इंदूरमध्ये गणेशविसर्जनाच्या वेळी भाजप आणि काँग्रेसने गणेशभक्तांच्या स्वागतासाठी वेगवेगळे स्टेज बांधले होते. यावेळी भाजपच्या स्टेजवरून कैलास विजयवर्गीय यांनी देशभक्तीपर गाणी गाऊन उपस्थितांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण केला. यावेळी विजयवर्गीय यांच्या गाण्यावर चक्क काँग्रेस कार्यकर्तेही नाचताना दिसले.
कैलाश विजयवर्गीय ‘ये देश हैं वीर जवानों का’ हे गाणे गात होते, यावेळी समोरच काँग्रेसच्या स्टेजवरील अनेक कार्यकर्ते उत्साहात नाचताना दिसले. राजकीय मतभेद विसरून तिथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आनंदाने हात उंचावत विजयवर्गीय यांच्या गाण्यावर नाचू लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांना नाचताना पाहून कैलाश विजयवर्गीय यांनी अधिक सूरात गायला सुरुवात केली. यावेळी स्टेजखाली उपस्थित असलेले लोकही आनंदाने नाचताना दिसत आहेत. लोकांच्या विनंतीवरून विजयवर्गीय यांनी यावेळी तीन-चार गाणी गात लोकांची वाहवा मिळवली. त्याचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.




विनोद नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ‘काँग्रेसवाले सुपर कैलाश विजयवर्गीय यांच्या गाण्यावर नाचत असतील, तर त्याचे अनेक राजकीय अर्थ काढता येऊ शकतात. त्यावर युजर्सकडूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलेय की, ‘शानदार! राजकारणात असे आणखी प्रसंग पाहायला मिळायला हवेत. असे प्रसंग घडत राहिले पाहिजेत. दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, २०१४ पूर्वी राजकारण असेच होते. नेते एकमेकांच्या पक्षाचे किंवा व्यक्तीचे वैचारिक विरोधक होते; पण शत्रू नव्हते. मग आले ‘द वन अँड ओनली’ द्वेषाचे व्यापारी. तिसऱ्या एका युजरने म्हटलेय की, बर्याच दिवसांनी राजकारणात इतके सुंदर चित्र पाहायला मिळाले आहे. अशा प्रकारे भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गाण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा नाचतानाचा व्हिडीओ पाहून लोकांनी सकारात्मक राजकारणाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
भाजप नेत्याने गायलेल्या गाण्यावर थिरले काँग्रेस कार्यकर्ते
भाजपाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, त्यात कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ मधून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट मिळाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी आश्चर्य व्यक्त करीत निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. “मी प्रचार करायला तयार होतो; पण तो कुठे होतो? पण तुम्हाला हवं तसं”, असेही ते म्हणाले होते.