दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज आज २८ मे रोजी उद्घाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले आहे. संसदेची नवी इमारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, जो आज पूर्णत्वास गेला आहे. पण या संसदेचा उद्घाटन सोहळा पहिल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अशताच आता उद्घाटन सोहळ्यातील एका फोटोमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आजच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध संतांना आणि विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते. नवीन संसद भवनाचे उद्घाटन पूजा आणि मंत्रोच्चाराने करण्यात आले. मात्र, विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, या सोहळ्यातील एक फोटो माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.




हेही देखील पाहा- रेल्वेतील चादर उशी बॅगेत भरली, चोरी उघड होताच खोटी कारणं सांगितली; Video व्हायरल होताच नेटकरी म्हणाले…
आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी अनेक संतांबरोबर ग्रुप फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन या सर्वांपासून लांब उभ्या राहिल्याचं दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “एकटी महिला, तीही देशाची अर्थमंत्री.. कोपऱ्यात? महिलांचा सन्मान?”
फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
माजी आयएएसच्या ट्विटवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. @ritesh_011 युजरने लिहिले “याला कोपऱ्यात उभं करणं नाही तर संस्कृती म्हणतात. तुम्ही गजब आयएएस आहात भाऊ, ही आमची संस्कृती आहे हे तुम्हाला कळायला हवे. ठिकाण कोणतेही असो, पण आपले संस्कार नेहमी लक्षात राहायला हवेत.” दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, आणखी शोधा, आज तुम्हाला खूप मसाला मिळेल. तर एका नेटकऱ्याने, “महिलांचा आदर कसा? नवीन संसद भवनापासून हाकेच्या अंतरावर महिला खेळाडूंना जी वागणूक दिली जाते, ती महिलांचा आदर आहे का?” असा प्रश्न विचारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय वाद सुरू होता. २१ विरोधी पक्षांनी नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे. संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, जी न्यायालयाने फेटाळली होती.