देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगात सुरु आहे. सुरुवातीच्या तुलनेत आता लसीकरणाने वेग घेतला असं म्हणता येईल. पण या वेगाबरोबरच निष्काळजीपणाच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी लस न देताच लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं, तर काही ठिकाणी एकाच व्यक्तीला दोनदा लस दिली. पण यावेळी काही वेगळंच घडलं आहे. इथे लाभार्थ्याला सुई तर टोचली पण त्या सिरींजमध्ये करोनाची लस भरलीच नव्हती. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया!

बिहारमधली ही घटना आता समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक युवक लस घ्यायला गेला. त्याला एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यांने इन्जेक्शनसुद्धा टोचलं. मात्र, इन्जेक्शनच्या सिरींजमध्ये तिने लस भरलेलीच नव्हती. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या महिलेने सिरींज घेतली, त्याचं आवरण फाडलं आणि थेट लाभार्थ्याला सुई टोचली. ही सगळी घटना लस घेणाऱ्या युवकाच्या मित्राने आपल्या मोबाईलमध्ये कैद करुन घेतली. मात्र त्यावेळी या युवकाला आणि त्याच्या मित्राला दोघांनाही हे लक्षात आलं नाही की या महिलेने लस दिलेलीच नाही.

आणखी वाचा- मध्य मुंबईतही बोगस लसीकरण शिबीर; दोघांना अटक

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांना या व्हिडिओबद्दल माहित आहे आणि त्यांनी या नर्सला ४८ तासांच्या आत घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. तसंच तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

त्याचबरोबर ही घटना नजरचुकीने झाली आहे. त्या दिवशी केंद्रावर गर्दी खूप असल्याने हे घडलं असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच या युवकाला आता पुन्हा लस दिली जाणार आहे. त्याला हव्या त्या तारखेला येऊन तो लसीचा पहिला डोस घेऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.